आम्ही मांडतो अस्सल इतिहास … पुराव्यानिशी !

पुण्याजवळील 'पुरंदर' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक महत्वाचा दुर्ग. १६४८ सालच्या मराठ्यांच्या पहिल्या लढाईपासून ते मिर्झाराजा सोबतचा पुरंदरचा तह, अशा अनेक ऐतिहासिक घडामोडी याठिकाणी शिवकाळात घडल्या. संभाजी महाराजांचा जन्मही याच किल्ल्यावर झाला. मराठ्यांची 'राजधानी' राजगड होण्यापूर्वी बराचसा कारभार याच किल्ल्यावरून होत असे. पुरंदर किल्ल्याचे तसे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे माची पुरंदर. या माचीतून डोंगर चढत गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आणि या पुरंदरचा सोबती म्हणजे वज्रगड. १८१८ नंतर पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 





या पुरंदरची माहिती आणि काही चित्रं ही १८८९ साली लंडनमध्ये छापून आली होती. या वृत्तपत्राचं नाव आहे Illustrated London News. यात पुरंदरचा किल्ला खाली काही बांधकाम दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात वज्रगडाची बाजू दाखवलेली आहे. या आठवडी वृत्तपत्रात छापून आलेल्या माहितीचा मराठी सार असा - 

पुरंदर पुण्यापासून वीस मैल आणि बॉम्बेपासून १४४ मैल दूर आहे. त्यात पुरंदर आणि वजीरगुर या दोन टेकड्यांचा समावेश आहे, ते जमिनीपासून १५०० फूट उंचीवर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ४५०० फूट आहे. टेकडीच्या माथ्यावर ३०० फूट खाली छावणी वसलेली आहे. सुमारे १३० जणांसाठी बॅरेक्स इथे आहेत . बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सर्व भागातून सैनिकांना भरती करण्यासाठी येथे पाठवले जाते. दोन्ही टेकड्यांच्या माथ्यावर मराठ्यांच्या तटबंदीचे अवशेष आहेत, या मराठ्यांच्या इतिहासाला रक्तपात आणि राजकारणाचा मोठा इतिहास आहे. असे म्हटले जाते की, इथे मोठ्या प्रमाणावर खजिना दडला आहे, परंतु तो इथे असेलच याबद्दल खात्री नाही . इतिहास सांगतो की, या किल्ल्याचा बुरुज बांधण्यात अडचण होती. तो तीन ढासळला. म्हणून राजाने काही लोकांची कत्तल केली आणि सोन्याच्या विटांनी पाया घातला त्यानंतर मात्र तो मजबूतपणे उभा राहिला. सदर घटना एका ताम्रपटात किंवा शिलालेखात सांगितली आहे. हे रेखाचित्रे बॉम्बे मेडिकल स्टाफचे सर्जन आर.एच. मूर यांनी घेतली आहेत.




या नरबळीचा घटनेची कथा आपल्याकडील कागदपत्रात देखील आढळते. ती कथा अशी - बीदरच्या बादशहाने पुरंदरवर शेंदरी बुरुजाचे काम लावले ते शेवटास जाईना. बादशहास दृष्टांत झाला की ज्येष्ठ पुत्र आणि ज्येष्ठ सुन यांचा बळी दिल्यास काम शेवटास जाईल. बादशहाने आपला इमानी येसाजी जिबे याला सांगितले. जिभेने स्वतःचा पुत्र आणि सुन यांना बळी देण्याची तयारी दर्शवली परंतु बादशहाने नकार दिला. अखेरीस बहिरजी सोमनाथ याचा पुत्र नाथनाईक आणि त्याची पत्नी देवकाई या उभयतांना इजा अश्विन वद्य अष्टमीस बुरुजाच्या पायात जिवंत गाडण्यात आले. तेव्हा कुठे हा बुरुज उभारला गेला. )


- रोहित पवार

पुरंदरचा किल्ला आणि नरबळीची कहाणी

छत्रपती थोरले शाहू महाराजांना(सातारा) प्राण्यांची शिकार करण्याची आणि पाळीव प्राण्यांची देखील प्रचंड आवड होती असे अनेक पत्रांवरून दिसते. साताऱ्यास त्यांचा शिकारखानाही समृद्ध होता, त्यात बरेच प्राणी होते.

Tiger attack on Chhatrapati Shahu Maharaj



शाहू महाराज एकदा पंढरपूर भागात गेले असता तिथे त्यांनी वाघाच्या शिकारीला जायचे ठरवले, सोबत अनेक सहकारी होते, या सहकाऱ्यांमध्ये साखरोजी यादव हा तरुण नोकर सोबतीला होता. शिकारी दरम्यान वाघाचा हल्ला झाला आणि तो त्यात मारला गेला. 

या दुर्दैवी घटनेनंतर शाहू महाराजांनी इ.स. १७३७ मध्ये त्याच्या वडलांना म्हणजेच केदारजी पाटील यांस कऱ्हाड प्रांतातील नाणेघोल गावातील ५ बिघा जमीन इनाम म्हणून दिली. शाहू महाराजांनी ,आपल्या सहकाऱ्यांनी दिलेले योगदान लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची वृत्ती आणि वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतला असावा असे म्हणता येईल. 


संदर्भ : श्री छत्रपती शाहू महाराज यांची रोजनिशी भाग १ 
- गणेश चिमणाजी वाड, द.बा. पारसनीस

- रोहित पवार

थोरले शाहू महाराज आणि वाघाचा हल्ला

 हिंदुस्थानातील वैद्यकशास्त्र तर प्राचीन आहेच परंतु पाश्चिमात्य लोकांनी पाऊल ठेवल्यापासून या वैद्यांचे आकर्षण वाढले. युरोपातील डच , फ्रेंच , पोर्तुगीज , इंग्रज इत्यादी लोक सुरवातीला व्यापाराच्या हेतूने हिंदुस्थानात आले. या परदेशी प्रवाशांप्रमाणे मध्ययुगात अनेक परदेशी डॉक्टर येऊन गेले. जहांगीर बादशाहास सर टॉमस रो, औरंगजेबास मनुची वगैरे वैद्यांनी चांगलीच भुरळ घातली होती. सोळाव्या शतकात 'अहमदनगर' येथे बुरहान निजामशाह याचा खासगी डॉक्टर म्हणून 'गार्सीया द ओर्ता' नावाच्या डॉक्टरने बरीच वर्षे सेवा केली.

पेशव्यांच्या कारकिर्दीतही अनेक पाश्चात्य वैद्य येऊन गेल्याचे दिसते. थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दीत** डॉ.सँडी** यांचे नाव आढळते तर सवाई माधवरावाच्या काळात डॉ.फिडले आणि डॉ. क्रुसो हे पुण्यात मुक्कामास होते. या डॉक्टर फिडलेने तर सवाई माधवरावास भूगोल विषयाचे बरेच ज्ञान दिले. पेशव्यांच्या राजवाड्यात व अनेक मराठे सरदारांस ते औषधे देत असत, असे सर चार्ल्स मॅलेट यांच्या पत्रव्यव्हारावरून दिसून येते. चला तर काही उल्लेख पाहुयात -


Doctors in Maratha History Peshwai





१) थोरल्या माधवरावांची प्रकृती तशी नाजूकच होती. निजामापाशी **डॉक्टर स्टुअर्ट आणि बाजवेल **हे दोन निष्णांत डॉक्टर होते, जास्तीचा पगार द्यायला लागला तरी चालेल पण त्यांना पाठवून द्या असे पत्रच माधवरावाने लिहले.

२)अजिंठ्यानजीक मुक्काम असताना थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या आईस (गोपिकाबाई) यांस पत्र लिहले आहे-
"तीर्थरूप मातुश्रीबाई वडिलांचे सेवेसी...प्रस्तुत माझी प्रकृती बरीच आहे. उरांत दुखत होते ते प्रस्तुत बरे जाले आहे. परंतु ती जागा बलट व्हावयास अवषध लावीत असतो व पोटातही फिरंग्याचे वोषध घेत असतो."

३)युरोपीय डॉक्टरांप्रमाणे आर्मिनिअन (पर्शियाच्या उत्तरेकडील प्रदेश) डॉक्टरांचीही छाप मराठ्यांवर पडली होती. पेशवाईत त्रिंबक विश्वनाथ (पेठे) याने राघोबाला लिहलेल्या पत्रात लिहले की,  
"स्वामींनी आज्ञा केली होती की, **आरमाणी वैद्यास **साहित्य, कामाठी वगैरे सर्व करून पाठवणे... "

४)माधवरावांचे आणखी एक पत्र नारायणरावास आहे , "**आरमाणी वैद्य **याजवळ तेल करावयास दिल्हे आहे. १ बाळंत शोफा , १ शहाजिरे, १ अग्नीसुन . ते तयार झाले असले पाठवून देणे"

५)कोकणातील रेवदंडा बंदराजवळ एक इंग्रजी वैद्य राहत होता. १७७३ साली त्याला पुण्यातल्या दरबारी आणले आणि दरमहा १५० रुपये त्याचा पगार ठरला.

६)सवाई माधवरावाच्या दिनचर्येत एक उल्लेख आला आहे - "श्रीमंतांच्या पायास कुरूप होते. त्याजवरील कातडी पाद्री इंग्रजांकडून छिनून काढून मलमपट्टी लावली. दुसऱ्या खेपेस पाच घटिका दिवसास पाद्री इंग्रज पायास औषध लावावयासी आला होता. पायाचे कुरूप काही मोडले आहे.

७)थोडा वेगळा उल्लेख म्हणायचा तर, १७९४ दरम्यान दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजी नावाच्या मराठी माणसाची एका मराठी कुंभाराने संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. जगातली ही कदाचित पहिली प्लास्टिक सर्जरी असावी.

८)पेशवाईच्या अखेरपर्यंत वैद्यकशास्त्रात अनेक नवनवीन शोध लागले होते आणि त्याचे फायदे युरोपीय डॉक्टरांच्या मार्फत महाराष्ट्रातील लोकांना मिळाले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात, देवीची लस पुण्यात दिली गेल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. मुंबईहुन ही लस पुण्यात येई. डॉ.कोट्स यामध्ये सहभागी होते.

"२ हजार रुपये इंग्रजाकडील वैद्याकडून घरात श्री देवी काढविल्या.. त्या यथास्थित कृपा करून आरोग्य जाहल्या. त्या वैद्यास दिले २०००..." शनिवारवाड्यात हे लसीकरण झाल्याने त्याची चर्चा झाली. डॉ. कोट्सला पुण्यात कायम ठेवा असे दुसऱ्या बाजीरावानी कर्नल क्लोजला सांगितले.


संदर्भ -
  1. इतिहास संग्रह - द. बा. पारसनीस (खंड २)
  2. पेशवे दप्तर -४३
  3. पेशवेकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भावे
  4. पेशवाईच्या सावलीत -नारायण चापेकर
  5. James wales in the times of Peshwa Sawai Madhavrao - डॉ . उदय कुलकर्णी

    - रोहित पवार

मराठ्यांच्या इतिहासात फिरंगी डॉक्टर

 


आजकाल सगळीकडेच घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत,पुणे शहरही त्याला अपवाद नाही. शिवकाळात किंवा पुढे पेशवाईत, कोथरूड हा भाग खरं तर पुण्याबाहेरचा मानला जात असे. भांबुर्डा (शिवाजीनगर) आणि इतर पेठा या मध्यवर्ती होत्या. पण कालांतराने कोथरूड भागास प्रचंड महत्व प्राप्त झाले आणि आज कोथरूड हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर बनला आहे. आज इथल्या घरांच्या किमती साधारणपणे करोडच्या पटीत आहेत. 

House in Kothrud Pune History




इ.स. १७८५ साली इथे एका घराची विक्री झाली तेव्हा १३७५ रुपयांना हा व्यवहार झाला होता. या व्यवहारात सदर जमीन त्यासोबत इमला (घर) आणि विहीर असे खरेदीखत झाले. त्यातही या व्यवहारात सुरवातीला ६०% आणि नंतर ४०% पैसे दिले गेले. रामराव बिलवलकरांनी हे घर नाईक कुटुंबास विकले.
आणखी बरेच उल्लेख आहेत जसे की, पुण्यातल्या गुरुवार पेठेत (रुंदी - साडे आठ गज चार तसु आणि लांबी सोळा गज तीन तसु ) या जमिनीवर बांधलेले घर असा व्यवहार १५०० रुपयांना झाला. सदर घटना १७७० ची आहे. 
तसेच १७७७ मध्ये तुळशीबागेजवळचे एक घर स्वखुशीने २०० रुपयांना विकले अशा नोंदी आपल्याला इतिहासात आढळतात. 
संदर्भ : 
पुणे नगर संशोधन वृत्त इस.१९४२ 
संपादक : चिं. ग. कर्वे , 
प्रकाशक : भारत इतिहास संशोधक मंडळ

- रोहित पवार

१३७५ रुपयात कोथरूड मध्ये घर

श्री काशी श्रेत्राबद्दल प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रचंड आदरभाव आजही टिकून आहे. तिथे काही पुण्यकर्म केले तर मोक्षप्राप्ती होईल असा समज मध्ययुगातही रूढ होता. 


Maratha built bridge in Kashi Uttarpradesh


नाना फडणीसांच्या काळात काशीजवळ कर्मनाशी नदीवर पूल बांधण्याची कल्पना मनात आली. नानांनी आपले कारकून भास्करपंत कुंटे यांना पुलाचे काम सुरु करण्याबद्दल लिहले. पुलाचा पाया खोदण्यास प्रारंभ झाला. परंतु नदीमध्ये वाळूचा भराव आणि पाण्याचा जोर फार होता. पायाभरणीचे काम काही पुरे होईना, त्यामुळे पूर्वीच्या समजुतीप्रमाणे मांत्रिक बोलवून अनुष्ठाने केली. 

ही गोष्ट नाना फडवीसांना कळली तेव्हा ते म्हणाले ,पुलाचे कामास मांत्रिकी अनुष्ठानाचा काहीही उपयोग होणार नाही. अनुष्ठाने बंद करवली आणि 'बेकर' नावाच्या एका युरोपीय कारागिरास २०००० रुपये देऊन पुलाचे काम सोपवले. पुलाच्या पायातील पाणी काढावयास दोन बंब तयार केले. परंतु ते तिथे लागू झाले नाहीत. तेव्हा त्याने कलकत्त्यावरून कळीचे बंब मागवून काम पूर्ण केले. 
आजकालच्या जमान्यात काम Outsource करून पूर्ण करणे ही संकल्पना रूढ होत आहे, परंतु मध्ययुगातही हा प्रकार अनेकदा दिसून येतो. 

संदर्भ : इतिहाससंग्रह : द. बा. पारसनीस
- रोहित पवार 

जेव्हा मराठे काशीत पूल बांधतात...

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांचे राज्य असताना इंग्रजी भाषेचा प्रसार बराच झाला होता. इंग्रजी बोलणारे - ऐकणारे पुष्कळ लोक होते. बाहेरून एखादा अधिकारी आला तर तो साहजिकच इंग्रजीतुनच संबोधत असे. परंतु एक इंग्रज अधिकारी असाही होऊन गेला ज्याने पुण्यात चक्क मराठीत भाषण दिले. 


Marathi Speech by Englishman

ही गोष्ट आहे १८६५ सालची, पुण्यात त्यावेळेसचे गव्हर्नर 'सर बार्टल फ्रिअर' आले होते. एक समारंभ म्हणून त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते.त्यावेळी अनेक सरदार व बडे लोक दरबारात जमले होते. 

या सर बार्टल फ्रिअर विषयी सविस्तर परत कधीतरी. पण गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारण्या पूर्वीच म्हणजे १८३५ मधेच या बार्टलने हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषा शिकून त्याविषयीच्या परीक्षाही पास झाला होता.तर या दरबारात सर्वांना संबोधण्यासाठी ते पुढे आले आणि मराठीतूनच सुरवात करत म्हणाले - 
"आपण येथे आल्याने आम्हास फार संतोष झाला. आपले येण्याने आपले मुलां माणसाचे व आपले रयतेचे कुशळ आम्हास कळले. आपली महाराणी मालिकामा आझम व्हिकटोरिया यांचे ठायी आपली एकनिष्ठ भक्ती असल्याचे कळून आले. या देशातील राज्यकारभार चालवणारे पुष्कळ गृहस्थ आपल्यास भेटले आणि या देशात सौख्य व आबदानी असण्याविषयी आपले महाराणी साहेबांची फार उत्कंठा आहे"

"आपण पुण्याहून परत जाण्यापुर्वी आपल्याशी आपल्या हिताच्या पुष्कळ गोष्टींविषयी संभाषण करण्याची आमची इच्छा आहे. विद्या म्हणजे केवळ लिहता वाचता येणे इतकेच नाही. लिहिता वाचता आल्यावाचुन व्हावे तितके विद्यासंपादन होते असे नाही. पण विद्यासंपादनास आणखीही साधने आहेत. निरनिराळी ठिकाणे पाहणे व तेथील गुणी लोकांशी संभाषण करणे हे एक आहे. कारण विद्वान असे सर्व लोक एकाच ठिकाणी आढळत नाहीत. बॉम्बे, अहमदाबाद, काशी अशी दुसरी शहरे पुष्कळ माहिती होण्यासारखी आहेत"

"दूरदेश पाहण्यास जावे तर खर्च लागतो परंतु आपले बरोबर जरूर तितकेच लोक घेऊन जाण्याविषयी आलिजा बहादूर शिंदे महाराज व होळकर महाराज यांचा उत्तम कित्ता आपण घेण्यासारखा आहे"

"पहा जर कदाचित आपल्या महाराणी साहेबांचे चिरंजीवांपैकी एकाची स्वारी येथे आली तर त्याजबरोबर त्यांचे भाषेने संभाषण करता येईल असे आपल्यामध्ये तयार असले पाहिजेत"

मी तुमच्याशी येथे अगदी साधेपणाने आणि सत्य तेच बोललो, अगदी जुन्या मित्राप्रमाणे बोललो कारण गेले अनेक वर्ष मी या देशासाठी अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. ब्रिटिश सरकार तुमची काळजी घेण्यास बांधील आहे. धन्यवाद. 


 

हे सर्व काही बोलून झाल्यावर , श्रीनिवास रावसाहेब पंतप्रतिनिधी उभे राहिले आणि या सर्व मराठ्मोठ्या भाषणाबद्दल त्यांनी बार्टर फ्रिअर यांचे आभार मानले.

दिनांक : ४ सप्टेंबर १८६५
----------------------------------
संदर्भ :
1) The Speeches and Addresses of Sir H.B.E. Frere - BalKrishna Pitale
2) पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास

- रोहित पवार 

मराठीत भाषण देणारा इंग्रज


२०१७ साली कामानिमित्त लंडनला जाणे झाले. इतिहासाचा विद्यार्थी असल्याने पावलं म्युझिअम कडे वळणार होतीच. इथे व्हिक्टोरिया अल्बर्ट या अतिशय प्रसिद्ध अशा वास्तुसंग्रहालयाला भेट दिली . इथे ज्या काचेच्या कपाटात छत्रपती शिवरायांची वाघनखं ठेवली आहेत तिथेच ठेवली आहे आणखी एक महत्वाची वस्तू - औरंगजेबची तलवार.

Aurangzeb's Sword



इस १६८० सालची स्टीलचं पातं असलेली ही सुंदर तलवार सोन्याच्या जाडसर नक्षीने मढवली असून त्यावर फारसी लिखाणही आढळते. त्यावर 'आलमगीर पादशाह २४ या रहमान या रहीम '' असे लिहले असून २४ हा आकडा त्याचा इस १६८० (हिजरी सन १०९१) सालातील औरंगजेबचा शासनकाळ दर्शवतो असा तर्क मांडला गेला आहे.

Aurangzeb's Sword

Aurangzeb's Sword


सदर तलवारीच्या पात्यांचे नक्षीकाम पाहता सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध तालवारींचा निर्माता असादुल्लाह इसफाहानी याने ही तलवार बनवली असल्याचे मानले जाते. फिल्ड मार्शल अर्ल किचनर यांच्या कलेक्शन मध्ये असलेली ही तलवार पुढे १९६४ साली या संग्रहालयात आणली गेली.

- रोहित पवार

लंडनमधील औरंगजेबची तलवार

मराठा स्वराज्याचे सरखेल, आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे' यांनी परकीय सत्तांना शह देत समुद्रावर सत्ता गाजवली.  काही वर्षांपूर्वी मराठ्यांच्या लहान बोटींना नावं ठेवणारे इंग्रज पुढच्या काळात मराठ्यांसारखी जहाजे आपल्याकडे  असायला हवीत असं म्हणायला लागले. यातच मराठ्यांच्या आरमाराचे यश दिसून येते. 





या कान्होजी आंग्र्यांवर   इंग्रज गव्हर्नर फिप्सने चाचेगिरीचा (pirates) आरोप केला, यावर कान्होजी आंग्रे यांनी अगदी समर्पक असे प्रत्युतर दिले ते वाचण्यासारखे आहे . 


" दुसऱ्याच्या मालकीची वस्तु आपल्या अधीन करुन घेण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, असल्या महत्वकांक्षा आपणासारख्या व्यापार्यांनी बाळगल्या नाहित का? जगाचा शिरस्ताच आहे, परमेश्वर स्वतःचे असे काहिच देत नसतो. तो एकाचे काढून दूसर्याला देतो. परमेश्वराची ही कृती चांगली कि वाईट हे कोण ठरवनार ? एक विविक्षित राजसत्ता ही हिंसा, अपमान आणि चाचेगिरी (piracy) याच्यावर चालली आहे असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापार्यांना आजिबात शोभत नाही. व चार पातशाह्यांशी झुंज देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तेव्हा याच गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. आम्ही त्याच पद्धतीने सत्तेवर आहोत. खरेखोटे मानो अथवा न मानो  त्यामुळेच आम्ही टिकून आहोत." 


संदर्भ : दर्याराज कान्होजी आंग्रे - सदाशिव शिवदे

मुळ संदर्भ :  Consultation Bombay Castle 7th august 1724


- रोहित पवार 

आंग्र्यांचे इंग्रजाना उत्तर

 अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत 'श्रीगणेश' आणि त्याचा परंपरेनुसार होणारा उत्सव हा खरंतर साजरा करण्यासोबतच तो अभ्यासाचाही विषय आहे. नानासाहेब खासगीवाले, भाऊसाहेब रंगारी, दगडुशेठ हलवाई या मान्यवरांच्या पुढाकारातुन आणि लोकमान्य टिळकांच्या पुरस्कारातून पुण्यातुन या उत्सवाला १८९३ साली सुरवात झाली.






आजच्या काळात गणेश मंडळांमधे आकर्षण असते ते प्रकाश व्यवस्था आणि हलत्या देखाव्यांबद्दल. परंतु त्याकाळात 'व्याख्यान' हा आकर्षणाचा विषय असे. स्वातंत्र्य चळवळीत लोकांचा सहभाग आणि जनजागृती हा त्यामागे मुळ हेतु होता. यात टिळक, त्यांचे सहकारी तसेच काही मुस्लिम व्याख्यातेही ठिकठिकाणी सहभाग घेत असत.

याकाळातही अनंत चतुर्दशीला मोठया उत्साहात मिरवणुक निघत असे. १८९४ च्या मिरवणुकीचा तपशिल केसरी वृत्तपत्रात सापडतो. मंडळांची संख्या वाढल्याने मिरवणुकीत मान कसा असेल याचा निर्णय टिळक आणि आन्नासाहेब पटवर्धन यांनी घेतला. आघाड़ीवर ग्रामदैवत कसबा, दूसरा तांबडी जोगेश्वरी त्यामागे क्रमांकाप्रमाणे आणि शेवटून तिसरा भाऊसाहेब रंगारी , शेवटून दूसरा दगडूशेठ हलवाई आणि शेवटी मंडईकरांचा अशी भव्य रांग लागत असे. रस्ते दुतर्फा लोक़ांनी फूललेले असत.

मिरवणुक सुरळीत पार पडावी यासाठी काशीनाथ जाधव , कृष्णशास्त्री कवडे यांच्यावर जबाबदारी होती . पुढे हे व्यवस्थापन करण्यासाठी १९०८ साली 'गणेश मंडळाची' स्थापना करण्यात आली.

इतिहास संशोधक आणि मोड़ी जाणकार मंदार लवाटे यांच्या 'पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा' या पुस्तकात गणेशोत्सव मिरवणुकींचा १८९३ पासुन २०१३ पर्यंतचा सर्व प्रवास दिला आहे. वरील सर्व तपशील ससंदर्भ दिले गेले आहेत. त्यासोबतच अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा देखिल समावेश करण्यात आला असून वाचनीय पुस्तक म्हणुन दखल घेतली पाहिजे.

संदर्भ : पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा - मंदार लवाटे
चित्र १ : भाऊसाहेब रंगारी मंडळ मिरवणुक वर्ष १९११
चित्र २ : मुखपृष्ठ - पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा

गणपती मिरवणुकीचा इतिहास