औरंगजेब - जदुनाथ सरकार
नाव : औरंगजेब - India Under Aurangzeb
लेखक : जदुनाथ सरकार
अनुवादक : डॉ. श. गो. कोलारकर
प्रकाशक : डायमंड प्रकाशन पुणे


इतिहासात अनेक राज्य उदयास आली आणि त्यांचे अनेक सम्राटही होऊन गेले. पण औरंगजेबासारख्या मुत्सद्दी,क्रूर राजाची कथाच निराळी.'औरंगजेब' हे पुस्तक म्हणजे मुघल इतिहासावर निर्विवाद पकड असणाऱ्या सर जदुनाथ सरकारांच्या संशोधनाचा एक सर्वोत्तम नमुना,कारण सरकारांचा हुकमी एक्का म्हणजे 'मुघल इतिहास' आणि त्यात सुद्धा औरंगजेब म्हणजे खासच .भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना प्रचंड संशोधन करून हे पुस्तक त्यांनी लिहले असून औरंगजेबासारख्या वादग्रस्त सम्राटाच्या जीवनाचा समग्र तपशील यात दिला आहे.२००६ साली डॉ.कोलारकर यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद करून तो प्रकाशित केला.

पुस्तकाची सुरवात होते ती औरंगजेबाच्या बालपणीच्या एका थरारक कथेने. दोन हत्तींची झुंज जवळून पाहताना त्यांचा हल्ला झाल्यावर प्रतिकार करणारा औरंगजेब सरकारांनी उत्तम रंगवला आहे.बालपणापासूनच संशयी जीवन जगणाऱ्या या औरंगजेबाने पुढे आपल्या बापाला कैद आणि भावाचा खून करून गादी मिळवली ,वारसायुद्धाचा हा प्रसंग या पुस्तकावरची पकड मजबूत करतो. ही गादी बळकवताना ज्यांनी त्याला मदत केली त्या मीर जुमला,शाइस्तेखान आणि मिर्झाराजा जयसिंग यांचा देखील मन राखण्याचा कुशल राजकारणी प्रयत्न औरंगजेबाने कसा केला ? यासोबतच त्याच्या युद्धकथा आणि युद्धकौशल्य यांचा सुपीक आढावा सरकारांनी यात दिला आहे.

औरंगजेब लिहिताना आपसूकच त्यांनी मराठ्यांनवर सुद्धा लिहिलेले आहे कारण मराठ्यांशिवाय औरंगजेब पूर्ण होऊच शकत नाही.लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुस्तकात एकूण २० प्रकरणे असून अगदी १० व्या प्रकरणापासुनच मराठ्यांचा उदय आणि मुघल-मराठा संघर्ष या पुस्तकाच्या अखेर पर्यंत दिसून येतो.९० वर्षाचे आयुष्य लाभलेल्या औरंगजेबाने तब्बल ५० वर्ष सम्राट म्हणून मुघल साम्राज्याच्या सर्वाधिक विस्तार केला. २०० वर्ष दक्षिणेत घट्ट पकड असणाऱ्या आदिलशाही आणि कुतुबशाहीचा अंत याच सम्राटाने केला.

आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याचा पुत्र अकबरचे त्याविरुद्ध बंड उभारले , तसेच तब्बल २७ वर्षे त्याला सह्याद्रीच्या मराठ्यांनी जबरदस्त झुंज दिली आणि यातच त्याला आलेले मरण ही औरंगजेबाच्या आयुष्याची खरी शोकांतिका रंगवताना या पुस्तकाचा शेवट होतो.शिवाजीराजाचं चरित्र औरंगजेबाशिवाय जसं पूर्ण होत नाही तसेच औरंगजेबही शिवाजीराजांशिवाय पूर्ण होत नाही हे तितकेच खरे. म्हणूनच औरंगजेब जरूर वाचावा.


- रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा