सॉल्स्टिस अॅट पानिपत - उदय कुलकर्णी




नाव : सॉल्स्टिस अॅट पानिपत
लेखक : डॉ. उदय कुलकर्णी
मराठी अनुवाद : विजय बापये
प्रकाशक : मुळा-मुठा पब्लिशर्स


पानिपत…फक्त नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर येतो तो मराठ्यांचा पराक्रम, पराभवाची शोकांतिका आणि दिल्लीचे तख्त राखण्याची शौर्यगाथा. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने केवळ मराठीजनांचाच नव्हे तर भारतवर्षाचा चेहरा बदलून टाकला. अशा या युद्धाविषयी आजवर अनेक ग्रंथ ,कादंबरी साहित्य लेह्ले गेले आहे. सद्ध्या समुहावर पानिपत समज-गैरसमज यावर चर्चा सुरु असल्याने रसिकांना डॉ.उदय कुलकर्णी लिखित "सॉल्स्टिस अॅट पानिपत" या पुस्तकाची ओळख करून देणे आवश्यक वाटते. लेखकाने अतिशय ओघवत्या शैलीत तसेच अनेक नवीन संदर्भ देत पानिपतच्या युद्धावर एक सूक्ष्म नजर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मराठ्यांच्या इतिहासाशी निगडीत असे अनेक कागद त्यांनी परदेशातून आणून प्रकाशित केले, २०१३ साली ब्रिटन मधून सर्वात जुनी आणि दीर्घ अशी पानिपतची बखरही त्यांनी प्रकाशित केली. सदर मूळ ग्रंथ हा इंग्रजीत असून त्याचा मराठी अनुवाद विजय बापये यांनी केला आहे.


या पुस्तकात पानिपत मोहिमेची पार्श्वभूमी , हिंदुस्थानातील मराठ्यांचे महत्व , उत्तरेतील राजकारणाची गुंतागुंत, होळकर-शिंदे संबंध , पानिपत युद्धप्रसंग , पराभवाची कारणमिमांसा आणि युद्धानंतरची परिस्तिथी अशा अनेक प्रसंगांचा वस्तुनिष्ठ वृतांत कथन केला आहे. पुस्तकाची सुरवात होते औरंगजेबच्या उत्तरार्धातील घडामोडीने , पुढे अब्दालीची पंजाब स्वारी, अटकेपार झंडे, उदगीर , कुंजपुरा असा हा प्रवास पानिपताच्या आमने-सामने लढाईवर येतो आणि पुस्तकाची अखेर होते ती अतिशय सुंदर अशा पानिपत रणसंग्रामाच्या उत्तरार्धातील 'स्मृतीलेखाने'. पुस्तक वाचताना ठीकठिकाणी दिलेले संदर्भ, समकालीन पत्रांतील अजरामर उद्गार आणि उपयुक्त नकाशांनी वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो यात शंका नाही. पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली ११ परिशिष्टे पानिपतासंबंधी अनेक नवीन गोष्टींचा उलगडा करतात. यात विशेष बाब म्हणजे पानिपत मोहिमेच्या जमाखर्चाचा ताळेबंद , जो विलक्षण महत्वाचा आहे. 


पानिपत का झाले? कसे झाले ? आणि पानिपतानंतर काय झाले ? , या तिनही प्रश्नांची सविस्तर उत्तरे डॉ. उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या या ग्रंथात मांडली आहेत. पानिपत प्रसंगाशी निगडीत स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्याच्या वृत्तीमुळे या ग्रंथाला विशेष संदर्भग्रंथाचा दर्जा प्राप्त झाला आहे. असा समग्र, चित्तवेधक आणि अस्सलग्रंथ पानिपतच्या इतिहासलेखनात अमुल्य भर घालणारा असून तो आवर्जून वाचावा.

- रोहित पवार 
No comments

No comments :

Post a Comment