रायगडची जीवनकथा - शांताराम आवळसकर




नाव: रायगडची जीवनकथा
लेखक : शांताराम विष्णु आवळसकर
प्रकाशक : 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ

'पूर्वेकडील जिब्राल्टर' इतकाच अभेद्य अशी ख्याती असलेला आणि महाराष्ट्राचा लाडका असा दुर्ग म्हणजे 'रायगड'. आजवर या दुर्गासंबंधी जितकं लिहलं गेलंय,जितकं संशोधन झालय तितकं इतर दुर्गाबद्दल झालं नाही. पण जर कोणाला रायगडाविषयी समग्र इतिहास वाचायचा असेल तर आवळसकरांच्या 'रायगडची जीवनकथा' पुस्तकाचा उल्लेख अव्वलस्थानी करावा लागेल. या पुस्तकाच्या निर्मितीची कल्पना तशी मुळात 'रायगड स्मारक मंडळाची'. त्यांनी सुचवल्यावरून १९५६ साली हा ग्रंथ आवळसकरांनी लिहला परंतु आर्थिक मदतीअभावी १९६२ पर्यंत प्रकाशन रखडले जे अखेरीस 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाने' पूर्ण केले.

पुस्तकात एकूण २८ प्रकरणे असून त्याची सुरवात रायगडाच्या दर्शनाने होते आणि '१८१८ नंतरचा रायगड' या प्रकरणाने शेवट होतो. रायगडाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा अनुभवला. राज्याभिषेकावेळी ऑक्झेंटन ने हात वर करून दाखवलेली हीऱ्याची अंगठी, दुसऱ्या राज्याभिषेकाला सिंहासनावर कोरलेल्या आठ सिंहाची नावे, राज्याभिषेकाचा खर्च ,संभाजीराजांच्या काळात झालेल्या रायगडावरील हालचाली तसेच पुढे पेशवेकाळात रायगडाच्या शिबंदीची व्यवस्था आणि वार्षिक उत्सव अशा अनेक अपरिचित गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात वाचायला मिळतो.

पूर्वीच्या संशोधनातून निर्माण झालेले अपसमज दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. ज्यात सूर्याजी पिसाळ ,रायनाक यांचा समावेश आहे. तसेच रायगडासंबंधी अनेक प्रश्नांची उकल या पुस्तकात केली गेली आहे. रायगडाच्या परिसरात फिरून ,अप्रकाशित आणि अव्वल दर्जाचे कागद पाहून त्यांचा प्रथमच उपयोग केला गेला आहे.तसेच पेशवे दप्तरातून रायगडासंबंधी बरीच माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.‘रायगडची जीवनकथा’हे पुस्तक म्हणजे रायगडाचा शोधनिबंधच म्हणावा लागेल. रायगडाच्या उत्पत्तीपासून ते वर्तमानापर्यंत अशी रायगडाची सारी कुंडली या पुस्तकात मांडली आहे. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींच्या नक्कीच संग्रही असावा असा हा ग्रंथ.

- रोहित पवार
1 टिप्पणी

1 टिप्पणी :