जे आले ते रमले : सुनीत पोतनीस






इतिहास हा महासागर आहे, त्यात जितके पैलू शोधण्याचा प्रयत्न करू तितकं काहीना काही हाती लागेलच. परकीयांच्या नजरेतून हिंदुस्थानचा इतिहास पाहणं हा माझ्या आवडीचा विषय. याच आवडीमुळे Foreign Biographis Of Shivaji या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न मी मध्यन्तरी केला. हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातुन विविध संस्कृतीचे, विविध कार्यक्षेत्रातले लोक भारताच्या भूमीकडे आकर्षित झाले. काही इथे येऊन परत मायदेशी गेले तर काही इथेच रमले. प्रत्येकाचा हेतू वेगळा होता. कोणी प्रवास करायला आला तर कोणी सत्ता स्थापन करायला. कोणी नोकरी-व्यवसायासाठी आला तर कोणी धर्मप्रसारासाठी. तर अशाच रमलेल्या लोकांची ओळख करून देणारं एक पुस्तक 'जे आले ते रमले' वाचनात आलं , त्याबद्दल थोडेसे ...
सर्वप्रथम सांगू इच्छितो की पुस्तकाची लिखाणशैली अतिशय ओघवती आहे. अनेक रंजक गोष्टी मुद्दाम हायलाईट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो. त्यामुळे इतिहासासारख्या क्लिष्ट विषयावर आधारित काही मोजक्या - रंजक पुस्तकामध्ये याचा समावेश करावा लागेल. यानिमित्ताने हर्षद सरपोतदार लिखित 'मंतरलेला इतिहास' पुस्तक मला आठवले.
विषयाकडे येतो, तर या पुस्तकाची सुरवात होते प्राचीन काळातील झालेल्या काही टोळ्यांच्या , समूहांच्या हिंदुस्थानातील स्थलांतराने, यामध्ये प्रामुख्याने कुषाण काळात ग्रीक - इराणी लोकांचं आगमन भारतात झालं. यानंतर शक आणि कुषाण यांच्याप्रमाणेच हुण टोळ्याही हिंदुस्थानात आल्या. या काळात भारतीयांना विदेशी मद्य गुजरातच्या बंदरात आयात होत होतं, अगदी तेव्हापासून विदेशी मद्याचं वेड भारतीयांना असावं का ?
या प्रकरणानंतर मात्र पुस्तकाप्रमाणे एखाद्या चित्रपटा वेग धरतं आणि जवळपास २५ ते ३० अतरंगी परकीयांची ओळख आपल्याला होते. फादर स्टीफन्स हा पहिला ब्रिटिश स्थलांतरित. १५७९ ला तो गोव्यात आला. याने हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार तर केलाच पण तो इथल्या भाषा , संस्कृतीत इतका रममाण झाला की त्याने चक्क मराठीतून बायबल म्हणजेच 'ख्रिस्तपुराण' लिहलं. हा ग्रंथ त्याने १६१४ साली लिहलाय. या परकीयांना भारतीय भाषेचं ज्ञान असणं आवश्यक वाटत होतं. अगदी शिवकाळातही इंग्रजांनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीला इथल्या भाषा शिकून घेण्याची गरज पडली. यासाठी 'नारायण शेणवी' हा दुभाषा त्यांना मदत करी. नंतरच्या काळात तर कंपनीने त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी मराठी, गुजराती आणि हिंदी भाषा शिकाव्यात म्हणून बरेच प्रयत्न केले. १८२० साली गंगाधर दीक्षित फडके हा मनुष्य इंग्रजांस मराठी शिकवीत असे.
पुस्तक पुढे पुढे सरकतं तेव्हा भोपाळचे बॉरबॉन, जीन अलार्द, ख्रिस्तोफ हेमेनडार्फ, वेरियर एल्विन वगैरे लोकांच्या रंजक कथां मग्न होऊन वाचायला होतं. यातला 'जीन अलार्द' हा शिखांचा राजा रणजीतसिंगांचा निष्ठावंत सेनानी, हा मूळचा फ्रान्सचा. इथल्याच एका 'बानू पांडे' नावाच्या स्त्रीच्या तो प्रेमात पडला. पुढे त्यांचं लग्न झालं. यासोबत 'वेंचूरा' नावाचा इटालियन तरुणही रणजीतसिंगांकडे नोकरीला होता. रणजीतसिंग एका डोळ्याने अधू होते. एकदा कंपनी सरकारच्या एका सेनाधिकाऱ्याने विचारलं तुमचे महाराज तर एका डोळ्याने आंधळे आहेत. त्यावर चिडून वेंचूरा म्हणाला की एका डोळा नाहीये तर तुमची ही हालत केली आहे विचार करा दुसरा डोळा असता तुमचं काय झालं असतं?
विलियम करे हाही असाच एक अवलिया. आला धर्मप्रसारासाठी पण भारतीय भाषांच्या प्रेमात पडला. मराठी भाषेचा व्याकरणकार, देवनागरी लिपीतील मुद्रणाची सुरवात करणारा वगैरे अनेक विशेषणं याला लावता येतील. यानंतर तंजारवरच्या ग्रंथालयाचा प्रणेता डॉ. श्वार्ट्झ चीही ओळख लेखकाने करून दिली आहे. ब्राह्मी लिपी संशोधक जेम्स प्रिन्सेप वगैरे अनेक परकीयांची अपरिचित माहिती या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. बरं हे सगळे इथेच रमले, यातल्या जवळपास सर्वांचाच मृत्यूपर्यंतचा प्रवास भारतीय भूमीवर झालाय.
तीनशे पानांच्या या पुस्तकात अनेक चित्रं , रंजक कथा वाचताना कुठेही संथपणा जाणवत नाही.पण एक इतिहास अभ्यासक म्हणून या पुस्तकाकडे पाहताना संदर्भ मात्र प्रत्येक ओळीनुसार किंवा प्रत्येक पाठानंतर असते तर पुस्तकाला अधिक वजन प्राप्त झालं असतं. पुस्तकाची बांधणी चांगली आहे. तरी आणि styling ही उत्तम जमलंय. मुखपृष्ठ मात्र अधिक सुंदर करता आलं असतं. हौशी वाचकाला आवडणारा पिवळसर (Storanza) पेपर पुस्तकासाठी वापरला असता तर आवडले असते. पुस्तकात typo चुका फारच कमी आहेत. या पुस्तकाचा दुसरा भाग लेखकाने लिहायला घेतला तर तो नक्कीच वाचायला आवडेल.
- रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा