मुसलमानी रियासत - गोविंद सरदेसाई
नाव : मुसलमानी रियासत खंड १,२
लेखक - गोविंद सखाराम सरदेसाई
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन
रियासतकार सरदेसाई हे इतिहास अभ्यासकांना परिचित आहेतच. मुसलमानी,मराठी आणि ब्रिटीश अशा तीन रियासतींचा सुमारे आठशे वर्षाच्या कालखंडाचा ससंदर्भ, समग्र आणि सविस्तर इतिहास त्यांनी संपादित करून ठेवला आहे. मुसलमानी रियासतीमधील इतिहासाचा कालखंड साधारण इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंतचा आहे. मुसलमानी धर्माची स्थापना,विस्तार आणि अरबी खिलाफतींच्या इतिहासाची पार्श्वभूमी या ग्रंथात सुरवातीला दिली असून महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने या ग्रंथाची सुरवात होते आणि सह्याद्रीच्या मराठय़ांशी झुंज देणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या ग्रंथाचा शेवट होतो.
पहिल्या खंडाच्या आरंभी रियासतकारांनी मुसलमान कोण होते? त्यांची पार्श्वभूमी काय ? हे सांगतानाच पुढे अरब, तुर्क, मूर, ऑटोमन, मोगल यांचे वंश,सत्ता व प्रदेश, त्यांनी केलेल्या स्वाऱ्या इत्यादींची ऐतिहासिक पाश्र्वभूमी सांगितली आहे. महंमद गझनीच्या पहिल्या स्वारीपासून बाबरने इ.स. १५२६ मध्ये जिंकलेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईपर्यंतचा उत्तर भारताचा इतिहास असून, अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीवर केलेल्या स्वारीपासून बहमनीसत्तेचा उदय ते फाळणीपर्यंतचा इतिहास दिला आहे . त्याबरोबरच सरदेसाईंनी विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त यांचा संक्षिप्त इतिहासही समाविष्ट केला आहे.
दुसऱ्या खंडात मुघल घराण्याचा इतिहास विस्तृत दिलेला आहे. बाबरने भारतात केलेला प्रवेश , इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या लढाईने मुघल साम्राज्याचा पाया घातला .पुढे त्याच्या वंशजांनी मोगल सत्तेचा भारतात सर्वाधिक विस्तार केला. औरंगजेबाने या विस्तारात सर्वाधिक भर घातली त्याचबरोबर दक्षिणेतल्या मुसलमानी सत्ता (आदिलशाही, कुतुबशाही) संपविल्या सोबतच मराठय़ांची सत्ता नष्ट करण्यासाठी आयुष्याची २७ वर्षे तो दक्षिणेत मराठय़ांशी अपयशी झुंज देत राहिला. इ. स. १७०७ मध्ये मराठय़ांच्याच प्रदेशातच मरण पावला. त्याच्या मृत्युबरोबरच मुघलांची सुमारे दोनशे वर्षांची सामथ्र्यशाली सत्ता समाप्त झाली आणि त्याचबरोबर तब्बल पाचशे वर्षांचे मुसलमानी रिसायतीचे भारतावरील वर्चस्वही संपले.
सरदेसाई यांनी १८९८ साली सर्वप्रथम मुसलमानी रियासतींचे प्रकाशन केले. लवकरच हा ग्रंथ वाचकांच्या पसंतीस पडला आणि त्यांना रियासतकार ही बिरुदावली त्यांना नकळत मिळाली, असा हा 'मुसलमानी रियासत' अमुल्य ग्रंथ नक्कीच संग्रही असावा.
- रोहित पवार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा