Shivaji's Visit to Aurangzib at Agra - Sir Jadunath Sarkar



नाव -Shivaji's Visit to Aurangzib at Agra 
लेखक/ संपादक - सर जदुनाथ सरकार
प्रकाशक - इंडियन हिस्टरी कॉंग्रेस

आग्रा-भेट प्रकरण हा शिवाजी महाराजांच्या चरित्रातील एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच नाट्यमय असा प्रसंग. या प्रकरणासंबंधी जशी मराठी साधने उपलब्ध आहेत त्याप्रमाणे इतर भाषेतील "समकालीन" साधने देखील उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे राजस्थानी नोंदी (Rajasthani Records) जे 'Shivaji's Visit to Aurangzib at Agra' या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. १९६६ साली सर जदुनाथ सरकार यांचा हा शोधग्रंथ 'इंडियन हिस्टरी कॉंग्रेसने' प्रकाशित केला. एकूण ६८ पत्रे यात समाविष्ट असून यात मुख्यत्वे परकालदास आणि कल्याणदास या राजस्थानी अधिकाऱ्यांमधला हा पत्रव्यवहार आहे. यातूनच आग्र्यातील दैनंदिन घडामोडी दक्षिणेत मिर्झाराजांना समजत होत्या.

या पत्रव्यवहारातूनच आग्र्यास जाताना महाराजांच्या स्वारीचा शाही थाट, शिवाजी महाराज आणि संभाजीराजे देखणे असल्याचा उल्लेख , स्वारीत हत्तीवर असलेले "भगवे" निशाण, शिवाजी महाराजांच्या पालखीला असलेले सोन्याचे घुंगरु,आग्र्यात शिवाजी महाराजांच्या मुक्कामाचे ठिकाण इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा या पत्रव्यवहातून उलगडून येतो.औरंगजेबच्या दरबारात शिवाजी महाराज कडाडले - "तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशहा देख्या......" हा जसाच्या तसा उल्लेखही याच राजस्थानी पत्रात नोंदविला आहे.

पुस्तकाची सुरवात होते ती मिर्झाराजा 'पुरंदर मोहिमेसाठी' पुण्यात पोहोचल्याच्या बातमीने तर शेवट हा मिर्झाराजाच्या मृत्यूच्या वृत्तांताने होतो. यादरम्यान पुरंदर-तह , विजापूर मोहीम, शिवाजीराजांची आग्रा भेट आणि सुटका अशा अनेक घडामोडींचा उल्लेख यात दिला आहे. मूळ 'डिंगल' भाषेतील ही सर्व पत्रे असून जदुनाथ सरकारांनी याचे मूळ पत्रांबरोबरच इंग्रजी भाषांतरही दिले आहे. थरारक अशा या प्रसंगातून महाराजांनी आपली सुटका करून घेतली आणि जगभर याचे राजकीय पडसाद उमटले.सर जदुनाथ सरकारांनी हा पत्रव्यवहार "Shivaji's Visit to Aurangzib at Agra- Rajasthani Records" या नावाने प्रकाशित केला आणि इतिहास संशोधनात मोलाची भर पाडली , असे हे पुस्तक अभ्यासकांच्या नक्कीच संग्रही असावे.

सद्ध्या या 'दुर्मिळ' पुस्तकाच्या काही प्रती 'भारत इतिहास संशोधक मंडळ,पुणे' येथे विक्रीस उपलब्ध आहे

- रोहित पवार
३ टिप्पण्या

३ टिप्पण्या :