पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन



पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन










अठराव्या शतकात अवघ्या महाराष्ट्राने हिंदुस्थानाचे सारथ्य  आणि  संरक्षण  केले. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगनारे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत, परंतु महाराष्ट्रातील  स्त्रियांच्या धार्मिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची उणीव भासत होती. ती भरून काढलीय  'पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन' या ग्रंथाने. डॉ. रत्नप्रभा पाटील यांचा हा शोधनिबंध.


१८ व्या शतकातील स्त्रियांच्या पुढाकाराने केलेले दानधर्म , यज्ञ , ज्योतिष , तीर्थयात्रा , नवस आणि व्रतवैकलय  यांसारख्या मुद्द्यांवर ससंदर्भ  चर्चा या पुस्तकात केली आहे. यासोबतच ग्रामदेवता -नैवैद्य ,जत्रा -उत्सव , अन्नछत्र -दक्षिणा अशा मुद्द्यांचे संदर्भ या पुस्तकात पाहावयास मिळतात. धार्मिक सण , विवाहसमारंभ व मनोरंजन यातील स्त्रियांचा सहभाग कसा होता , उदाहरण म्हणून -सरदार घराण्यातील स्त्रिया मनोरंजनासाठी पत्ते खेळत असल्याचे दाखले लेखिकेने दिले आहेत.

सदर पुस्तकात होळकर घराण्यातील अहिल्याबाई, बाजीराव पत्नी काशीबाई, आनंदीबाई पेशवे , माधवरावांची आई गोपिकाबाई आणि पत्नी रमाबाई , शाहू महाराजांची धाकटी राणी सगुणाबाई , आंग्रे घराण्यातील स्त्रिया तसेच पुरंदरे ,शिंदे ,पटवर्धन ,नागपूरकर भोसले अशा अनेक महत्वाच्या घराण्यातील स्त्रियांच्या धार्मिक जीवनातील गोष्टी लेखिकेने पुस्तकात समाविष्ट केल्याने त्यास वजन प्राप्त झाले आहे .


ओळीनुसार संदर्भ दिल्याने अभ्यासकांना याचा फायदा नक्कीच होईल परंतु शेकडो संदर्भ दिल्याने वाचताना कुठेही क्लिष्टपणा जाणवत नाही. खरं तर हे केवळ पुस्तक नसून हा एक शोधनिबंध आहे हे पुस्तकाच्या सुरवातीलाच नमूद केले आहे. पूर्वी सण कसे साजरे केले जात याची पुस्तकात दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे आपली संस्कृती पुरुषप्रधान होती अशी बेधडक टीका केली जाते परंतु इतिहासातील धार्मिक जीवन पाहता स्त्रिया अग्रस्थानी असल्याचे तात्काळ लक्षात येते. असा हा उपयुक्त ग्रंथ नक्कीच संग्रही असावा .


नाव :पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन
लेखिका : प्रा.डॉ. रत्नप्रभा पाटील
प्रकाशक : श्वेता पब्लिकेशन  (०२४०-२३२४२३१)


- रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा