ऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर
नाव - ऐतिहासिक पोवाडे
लेखक / संपादक - य.न.केळकर
प्रकाशक- डायमंड प्रकाशन

पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाष्य करणारे कवन, अशी आजवरची समजूत.परंतु मध्ययुगात पोवाडा साहित्यप्रकार इतर अनेक कुतूहलजनक घटनांचे निवेदन असे. या पोवाड्यांच्या निर्मितीस सुरुवात केली ती गोंधळ्यांनी. देवीच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या सरदारांच्या पराक्रमाचे पोवाडे गाऊ लागले. अज्ञानदासाने रचिलेल्या अफझलखानवधाच्या आणि तुळशीदासकृत सिंहगडाच्या पोवाड्यात देवीच्या कृपेचा उच्चार वारंवार झाला आहे, तो यामुळेच. पोवाड्यांचे इतिहासात महत्व ओळखून ते छापून काढण्याचे काम १८६९ सालापर्यंत कोणी केले नव्हते.याची सुरवात केली ती 'तुकाराम शाळीग्राम' आणि 'गोविंद शितुत' यांनी. गावोगाव फिरून गोंधळीचे पत्ते काढून हे वाड्मय त्यांनी उपलब्ध करून दिले.

य.न. केळकर यांनी १९२८ साली असे पोवाडे एकत्र करून 'ऐतिहासिक पोवाडे' या ग्रंथात समाविष्ट केले. मराठ्यांच्या इतिहासातील तब्बल ७७ महत्वाच्या पोवाड्यांचा समावेश यात केला आहे. पुस्तकाची सुरवात होते ती, छत्रपती शिवाजीमहाराजांचा पोवाडा (अफझलखान वध इस १६५९) पासून आणि अखेर होते ती 'तिसऱ्या रघुजी भोसल्यांच्या पोवाड्याने' (इस १८१८ ). म्हणजे जवळपास संपूर्ण मराठेशाहीच्या काळातील पोवाड्यांचा त्यांच्या शब्दार्थासह समावेश केळकरांनी केलेला दिसतो.

पोवाडा हा इतिहासात कोणत्या दर्जाचे साधन मानावे याबद्दल केळकर लिहतात कि , पोवाडा हा पद्यमय बखरीसारखा भासतो परंतु तो जर समकालीन आणि इतर साधनांशी जुळता असेल तर विश्वसनीयच मानावा लागतो. पोवाड्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो उदाहरणार्थ अफझलखान वधाच्या पोवाड्यात कृष्णाजी भास्करला मारल्याचा उल्लेख आढळत नाही, नारायणरावांच्या वधाच्या पोवाड्यात शाहीर नारायणरावाचा पक्षपाती असून देखील आनंदीबाईंच्या नावाचा उल्लेखसुद्धा नाही.प्रभाकर खर्ड्याच्या पोवाड्यात स्वारीवर गेलेल्या पेशवे सरदार शिलेदारांची बिनचूक यादी दिली आहे तसेच सवाई माधवरावांच्या मृत्युच्या पोवाड्यात अनेक नवीन माहितीचे पैलू उलगडतात. पुस्तकाला लाभलेली विस्तृत प्रस्थावना अतिशय महत्वपूर्ण आहे.

१९४४ च्या दुसर्या आवृत्तीनंतर तब्बल ६४ वर्षांनी या पुस्तकाचे पुनर्मुद्रण झाले ,मराठ्यांचा काव्यमय इतिहास सांगणारा असा हा महत्वपूर्ण ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवा."शूर मर्दाचे पोवाडे | गूळाविन गोड साखरेचे खडे"

- रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा