सुरतेची लुट आणि खजिना
'ही गोष्ट सुरु होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा, पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुतीतला प्रचंड ऐवज हरवला ! कुठे गडप झाला हा खजिना?' असं कथानक घेऊन एक उत्कृष्ट कादंबरी रचली गेली जी सद्ध्या चर्चेत आहे. पण इतिहास याबद्दल काय सांगतो याचा 'शोध' अस्सल साधनातून आपण घेऊया.
लुट (काल्पनिक चित्र) |
सतराव्या शतकात सुरतेची बाजारपेठ अतिशय समृद्ध आणि कोट्याधीश व्यापाऱ्यांची पंढरीच. हीच सुरत यापूर्वीही शिवाजी महाराजांनी इस १६६६ साली लुटून बरीच संपत्ती स्वराज्यात दाखल केली होती. यानंतर १६७० साली शिवाजीराजांनी पुन्हा सुरतेवर हल्ला चढवला. प्रथम महाराज कल्याणला आले तेथून पंधरा हजाराच्या फौजेनिशी सुरतेत थडकले. २ ऑक्टबर ते ५ ऑक्टोबर असे तीन दिवस सुरतेची धूळधाण केली. या लुटीत शिवाजी महाराजांना एकूण ६६ लाख रुपये मिळाले.
या लुटीदरम्यान शिवाजी महाराजांनी एकीकडे सुरतेतल्या डच, फ्रेंच आणि इंग्रज वखारिंना अभय दिले तर दुसरीकडे मुघल अधिकाऱ्यास पत्र लिहले कि, "दरसाल १२ लाख रुपये न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी उरलेले शहर जाळून टाकेन". सुरत लुटीने मुघलांना चांगलाच धक्का बसला. लुटीच्या तिसऱ्या दिवशी (५ ऑक्टो) महाराज अचानक सुरत सोडून गेल्याची बातमी पसरली.
सुरतेहून महाराज पेठ - बागलाणमार्गे मुल्हेरकडे (नाशिक जिल्हा) निघाले. साल्हेर-मुल्हेरवरून चांदवडास येऊन कंचनमंचन घाटाने कोकणात उतरणार असे मराठ्यांच्या हालचालीवरून दिसते . पंधरा हजाराच्या फौजेनिशी महाराज चांदवडनजीक आले. मुघल सेनापती 'दाऊदखान कुरेशी' याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणि १७ ऑक्टोबर १६७० रोजी घनघोर युद्ध होऊन त्यात मुघलांचा पराभव झाला.तीन हजार मुघल मारले गेले. हि लढाई 'वणी-दिंडोरीची लढाई' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांना सुरतहून आणलेल्या लक्ष्मीसह अडविण्याचा मोगली प्रयत्न पार धुळीस मिळाला. उघड्या मैदानावर देखील विजय प्राप्त करू शकतो हा मराठ्यांचा विजयिष्णू भाव जागृत होऊन त्या भागातील अलंग,कुलंग,त्रिंगलवाडी हे गडहि स्वराज्यात दाखल झाले. विजयी शिवाजीराजे नाशिकमार्गे सहीसलामत हरिश्चंद्रगडा जवळील 'कुंजरगडावर' येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोबर अखेरीस रायगडावर पोहोचले.
हि सर्व हकीगत पाहता सुरत लुटीचा खजिना सुखरूप स्वराज्यात पोहोचला असे म्हणावयास हरकत नाही. मुघलांचा हेतू होता शिवाजीराजांना अडवणे आणि महाराजांचा हेतू होता सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षित घेऊन जाणे, आणि यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. लुटीचा खजिना हा खुश्कीच्या (जमिनीवरून) मार्गाने आणला गेला . ऑक्टोबर दरम्यान समुद्रामार्गे मराठी आरमार पाठवल्याची अथवा अडवल्याची एकही नोंद नाही.याउलट डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांचे आरमार मराठ्यांना दबकून होते असे त्यांच्या पत्रव्यवहारातून दिसते. सुरत ते रायगड प्रवासात कुंजरगड, अलंग,कुलंग,त्रिंगलवाड हे गड स्वराज्यात दाखल झाल्याने लुटीतला काही ऐवज या गडांच्या शिबंदीसाठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा खजिना कुठेही गायब न होता स्वराज्यात दाखल झाला हे वरील पुराव्यांवरून दिसून येते.
- रोहित पवार
संदर्भ :
जेधे शकावली
English Records on Shivaji
शिवकालीन पत्रसार संग्रह
समग्र सेतूमाधवराव पगडी (खंड२)
शककर्ते शिवराय - विजय देशमुख
मराठी रियासत - सरदेसाई
Shivbharat
plunder of surat
,
Salher -mulher fort
,
shivaji maharaj
,
shivaji visit to surat
,
shodh muralidhar khairnar
,
surat plunder
,
treasure
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा