शककर्ते शिवराय - विजय देशमुख
नाव - शककर्ते शिवराय (खंड १,२ )

लेखक - श्री. विजयराव देशमुख
प्रकाशक - छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर

महाराष्ट्राचे मानबिंदू 'शिवराय' हे एक अदभुत रसायन वर्षानुवर्षे अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घालत आले आहे.शिवरायांचे आयुष्य हे अत्यर्क अशा घटनांनी भरलेले आहे. गेल्या शंभर वर्षात अनेक चरित्रकारांनी शिवाजीमहाराजांवर चरित्र लेखन केले आहे.परंतु त्यातूनही वेगळा ठसा उठवणारे शिवचरित्रकार "विजयराव देशमुख" यांच्या "शककर्ते शिवराय" या शिवचरित्राचे स्थान निर्विवाद अव्वल आहे.उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचा चिकित्सक रीत्या अभ्यास अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी मांडलेले आहे. 

इतिहास हा केवळ तर्कावर, कल्पनाशक्तीवर मांडला जात नाही तर तो ससंदर्भ आणि अभिनिवेशरहित मांडून सत्यतेच्या जवळ जातो हे विजयरावांनी पटवून दिले आहे. कारण तब्बल ७२ प्रकरणांत तब्बल २८०० संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. यासाठी १२० पेक्षा अधिक संदर्भग्रंथांचा उपयोग त्यांनी करून घेतला आहे.हे आकडे कितीही मोठे दिसत असले तरी वाचताना कुठेही क्लिष्टता जाणवत नाही. पुस्तकाची सुरवात होते ती म्हणजे 'शिवपूर्वकालीन उत्तर भारत' या प्रकरणावरून आणि शिवाजी महाराजांच्या निधनाच्या घटनेबरोबर शेवट होतो.शिवाजीमहाराजांचे मातृ-पितृकुळ,प्रतापगडाचे मंत्रयुद्ध, आग्राभेटीचा राजस्थानी पत्रांचा तपशील, परतीचा मार्ग, कर्नाटक मोहिमेचा तपशील अशी अभ्यासकांना वेगळे खाद्य पुरवणारी अनेक प्रकरणे यात आहेत.

१९८२ साली हा ग्रंथ छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर यांनी प्रकाशित केला. या ग्रंथाचा लेखन कालावधी १९७४ ते १९८२ असा आठ वर्षाचा आहे. १९८२ साली प्रकाशित झाल्यावर हातोहात याच्या २ आवृत्त्या हातोहात खपल्या आणि लगेच ते दुर्मिळ झाला! यानंतर ग्रंथाची सातत्याने मागणी होत होती, सव्वीस वर्षानंतर २०१० साली याच लोकआग्रहास्तव पुन्हा एकदा 
हा ग्रंथ प्रकाशित केला गेला. 


विजयराव देशमुख गेल्या चार दशकापासून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत, तसेच अनेक स्थळांची भौगोलिक पाहणी करून त्यांनी आपले निष्कर्ष तपासून घेतले आहेत. शिवचरित्रातील प्रसंगांचा तपशील पुरवणारी अनेक साधने उपलब्ध आहेत. परंतु त्या साधनांचे सखोल अध्ययन करून त्यांची नीट संगती( interpretation) लावण्याचे कार्य विजयरावांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले आहे.निर्मितीपासुनच त्याची 'प्रासादिकता' शिवभक्तांनी, विद्वानांनी, संशोधकानी सर्वांनीच अनुभवली आहे. म्हणून फक्त अभ्यासकच नव्हे तर सर्वसामान्यांच्या घराघरात हे शिवचरित्र आवर्जून असावे ! 

'शककर्ते शिवराय' आणि थोरामोठयांचे अभिप्राय! 

"सत्य कथनाचे दृष्टीने क्रम लावायचा तर पहिला क्रमांक देशमुखांना द्यावा लागेल. दुसरा पुरंदरे यांच्या पुस्तकाला आणि तिसरा (रणजित) देसाई यांच्या पुस्तकाला द्यावा लागेल. नव्याने विस्तृत शिवचरित्र लिहिणार्‍यास आपल्या चरित्रास पुर्णता आणण्यासाठी श्री देशमुख यांचे पुस्तक लक्षपुर्वक वाचावेच लागेल."
 ग. ह. खरे 
---------------

"ऐतिहासिक साधनांचा चिकित्सापुर्वक अभ्यास मांडणारे श्री विजयराव देशमुख हे गेल्या पंचविशीतील प्रथमस्थानीचे शिवचरित्रकार आहेत... येथुन पुढे नव्याने शिवचरित्रावर लेखन करावयास जो जो अभ्यासक बसेल त्याला श्री देशमुखांच्या प्रस्तुत शककर्ते शिवराय' या शिवचरित्राची दखल न घेता पुढे जाता येणार नाही."
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे
---------------

"आपला शककर्ते शिवराय ग्रंथ लक्षपुर्वक वाचला. मला प्रथम दर्शनीच असे जाणवले की आपल्या ग्रंथातील माहिती पेक्षा अगदी निराळी माहिती मिळाली तरच यापुढे शिवचरित्र लिहिण्याचे धाडस लेखकांनी करावे."
स. मा. गर्गे, संपादक भारतीय समाजविज्ञान कोश, पुणे
सुबुध्द माणसाच्या घरात हे चरित्र राहिल यात शंका नाही. असा मोलाचा नजराणा आपण मराठी भाषेला देऊन आम्हाला उपकृत केले आहे.
ना. सं. इनामदार, पुणे
--------------

नेहमी वाचनात असलेल्या मजकडील पुस्तकांत आपल्या शककर्ते शिवराय या ग्रंथाचे दोन्ही खंड आवर्जुन असतात. मी त्याची काही पारायणेच केली असावीत. आपला ग्रंथ बहु निका झाला आहे.
दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर-रोहित पवार
1 टिप्पणी

1 टिप्पणी :