ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
नाव : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
लेखक : डॉ. सदाशिव शिवदे
प्रकाशक - डायमंड प्रकाशन पुणे

मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासाची सुरवात होते ती छत्रपती शिवाजी महाराजांपासुन,महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती.खासा औरंगजेब दख्खनेत उतरला होता. संभाजी महाराजांची एकूणच कारकिर्द पहिली तर ती अतिशय संघर्षपूर्ण होती. शंभुकाळात तुलनेने फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने त्यांच्या चरित्रातील काही गोष्टींचा परिपूर्ण आढावा घेता येत नाही. संभाजीचरित्रावर यापूर्वी समग्र आढावा डॉ. कमल गोखले ,वा.सी बेंद्रे यांनी घेतला होता. परंतु त्यानंतर अनेक साधने नव्याने उजेडात आली. अशाच उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' डॉ. सदाशिव शिवदे यांनी लिहले.

एकूण १३ प्रकरणात हे शंभुचरित्र डॉ.शिवदे यांनी शब्दबद्ध केले आहे. पुस्तकाची सुरवात होते ती संभाजीराजांच्या जन्मापासून मग पुढे दिलेरखान प्रकरण, १६८० नंतरचा धामधुमीचा कालखंड, गोव्याची स्वारी, अकबर -संभाजीराजे संबंध, कवीकलश व्यक्तीवेध, फितुरी अन मृत्युंजय आमावस्या अशा अनेक रोमांचक प्रकरणातून या चरित्रग्रंथाचा शेवट होतो.या चरित्रग्रंथाचे वेगळेपण म्हणजे डॉ. शिवदे यांनी अंत्रुजचा शिलालेख फोटोसह प्रसिद्ध करून संभाजी महाराजांचे प्रजेबद्दलचे प्रेम पुराव्यासह दाखवले आहे. तसेच संभाजीराजांचे बाकरे भटजींना दिलेले मुळ दानपत्र प्रसिद्ध करून त्याचे भाषांतर दिल्याने संभाजी महाराजांच्या स्वभावरेषेचा आढावा वाचकांना घेता येतो. त्यासोबतच या ग्रंथात संभाजी महाराजांचे एक अस्सल चित्र प्रथमच प्रसिद्ध केले आहे. पुरक असे नकाशे, चित्रे, छायाचित्र ग्रंथात समाविष्ट केल्याने इतिहासप्रेमींची ,वाचकांची मोठी सोय झाली आहे.

शेवटची दोन प्रकरणे परिशिष्ट स्वरूपात दिली आहेत ज्यामध्ये संस्कृतपंडित संभाजीराजे ,प्रशासकीय व्यवस्था व इतर काही महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. संभाजी महाराजांवर आजवर अनेक ठिकाणी उलट सुलट लिखाण झाले आहे. परंतु इतिहास हा राग-द्वेश बहिष्कृत करून सांगितला पाहिजे. डॉ. सदाशिव शिवदे यांनी तशीच तटस्थ भूमिका घेऊन हा चरित्रग्रंथ लिहला. इतिहासाचा अभ्यास करताना अशा पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्की उपयोग करता येईल. असा हा 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' ग्रंथ अवश्य संग्रही असावा.

- रोहित पवार
No comments

No comments :

Post a Comment