राधामाधवविलासचंपू - जयराम पिंड्ये




नाव : राधामाधवविलासचंपू‬
प्रकाशक - वरदा प्रकाशन पुणे
लेखक - जयराम पिंड्ये
संपादक - विश्वनाथ राजवाडे

'राधामाधवविलासचंपू' , नाव थोडं वेगळ वाटलं ना? चंपू म्हणजे गद्य-पद्य मिश्रित काव्य असणारा साहित्यप्रकार. राधामाधवविलासचंपू म्हणजे शाहजी महाराजांच चरित्रच म्हणावे लागेल. हा प्रशंसापर चरित्रग्रंथ जयराम पिंड्ये यांनी लिहला. कर्नाटकात शाहजी महाराजांच्या दरबारात ते संस्कृतपंडित होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे काव्य शाहजीराजांना स्वतः ऐकवलं होते म्हणूनच समकालीन अशा या ग्रंथाचे स्थान इतिहासात अव्वल आहे.

मूळ संस्कृत ग्रंथात एकूण अकरा प्रकरणे असून त्यात शाहजी महाराजांची प्रशंसापर वर्णने देण्यात आली आहेत आणि जवळपास ७० दरबारी लोकांच्या नावांचा उल्लेखही कवीने केला आहे.यासोबतच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे , जिजाबाई आणि शिवाजी महाराजांविषयी उल्लेख आढळतात.यावरून नवीन माहितीदेखील उजेडात येते.

सदर ग्रंथाचे संपादन इतिहासाचार्य विश्वनाथ राजवाडे यांनी १९२२ साली केले. राजवाडे आणि त्यांच्या ग्रंथाला असणारी विस्तृत प्रस्तावना हे समीकरण सर्वपरिचित आहेच. मूळ ७६ पानांच्या काव्यग्रंथाला तब्बल २०० पानांची प्रस्तावना राजवाडयांनी लिहिली आहे. पाणिनीकालीन समाजव्यवस्था, महाराष्ट्रिक शब्दाची व्याख्या, वर्णव्यवस्था , भोसले कुळ याबद्दल राजवाडे यांची मते या ग्रंथात त्यांनी समाविष्ठ केली आहेत.अशा या ग्रंथाचे एकमेव संपूर्ण असे हस्तलिखित उपलब्ध आहे ज्यावरून राजवाडे यांनी हा ग्रंथ संपादित केला. हे हस्तलिखित कुठे आणि कसे प्राप्त झाले हा प्रसंगही वाचण्यासारखा आहे. एका इतिहाससंशोधकाची शोध घेण्याची वृत्ती कशी असते? हे यातून दिसून येते.


मूळ ग्रंथकार जयराम पिंड्ये हे केवळ संस्कृतपंडितच नव्हे तर त्यांना एकूण १२ भाषा अवगत होत्या. या ग्रंथातदेखील संस्कृत सोबतच हिंदी, मराठी, फारसी, गुजराथी पद्ये आहेत. मराठी इतिहासाला उपलब्ध संदर्भांमुळे सुरवात होते ती शिवाजी महाराजांपासून. परंतु शाहजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा समकालीन ग्रंथ नक्कीच महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक अभ्यास्काने प्रस्तावनेसह वाचला पाहिजे.
- रोहित पवार
1 टिप्पणी

1 टिप्पणी :

  1. खुप छान माहीती आहे सर....
    F.Y.B.A chya History subject madhe 1st chapter madhe जयराम पिंड्ये yanchya राधामाधविलास चंपू ya sanskrutik kavygranth cha ullekh ahe..

    उत्तर द्याहटवा