मराठीत भाषण देणारा इंग्रज

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांचे राज्य असताना इंग्रजी भाषेचा प्रसार बराच झाला होता. इंग्रजी बोलणारे - ऐकणारे पुष्कळ लोक होते. बाहेरून एखादा अधिकारी आला तर तो साहजिकच इंग्रजीतुनच संबोधत असे. परंतु एक इंग्रज अधिकारी असाही होऊन गेला ज्याने पुण्यात चक्क मराठीत भाषण दिले. 


Marathi Speech by Englishman

ही गोष्ट आहे १८६५ सालची, पुण्यात त्यावेळेसचे गव्हर्नर 'सर बार्टल फ्रिअर' आले होते. एक समारंभ म्हणून त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते.त्यावेळी अनेक सरदार व बडे लोक दरबारात जमले होते. 

या सर बार्टल फ्रिअर विषयी सविस्तर परत कधीतरी. पण गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारण्या पूर्वीच म्हणजे १८३५ मधेच या बार्टलने हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषा शिकून त्याविषयीच्या परीक्षाही पास झाला होता.तर या दरबारात सर्वांना संबोधण्यासाठी ते पुढे आले आणि मराठीतूनच सुरवात करत म्हणाले - 
"आपण येथे आल्याने आम्हास फार संतोष झाला. आपले येण्याने आपले मुलां माणसाचे व आपले रयतेचे कुशळ आम्हास कळले. आपली महाराणी मालिकामा आझम व्हिकटोरिया यांचे ठायी आपली एकनिष्ठ भक्ती असल्याचे कळून आले. या देशातील राज्यकारभार चालवणारे पुष्कळ गृहस्थ आपल्यास भेटले आणि या देशात सौख्य व आबदानी असण्याविषयी आपले महाराणी साहेबांची फार उत्कंठा आहे"

"आपण पुण्याहून परत जाण्यापुर्वी आपल्याशी आपल्या हिताच्या पुष्कळ गोष्टींविषयी संभाषण करण्याची आमची इच्छा आहे. विद्या म्हणजे केवळ लिहता वाचता येणे इतकेच नाही. लिहिता वाचता आल्यावाचुन व्हावे तितके विद्यासंपादन होते असे नाही. पण विद्यासंपादनास आणखीही साधने आहेत. निरनिराळी ठिकाणे पाहणे व तेथील गुणी लोकांशी संभाषण करणे हे एक आहे. कारण विद्वान असे सर्व लोक एकाच ठिकाणी आढळत नाहीत. बॉम्बे, अहमदाबाद, काशी अशी दुसरी शहरे पुष्कळ माहिती होण्यासारखी आहेत"

"दूरदेश पाहण्यास जावे तर खर्च लागतो परंतु आपले बरोबर जरूर तितकेच लोक घेऊन जाण्याविषयी आलिजा बहादूर शिंदे महाराज व होळकर महाराज यांचा उत्तम कित्ता आपण घेण्यासारखा आहे"

"पहा जर कदाचित आपल्या महाराणी साहेबांचे चिरंजीवांपैकी एकाची स्वारी येथे आली तर त्याजबरोबर त्यांचे भाषेने संभाषण करता येईल असे आपल्यामध्ये तयार असले पाहिजेत"

मी तुमच्याशी येथे अगदी साधेपणाने आणि सत्य तेच बोललो, अगदी जुन्या मित्राप्रमाणे बोललो कारण गेले अनेक वर्ष मी या देशासाठी अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. ब्रिटिश सरकार तुमची काळजी घेण्यास बांधील आहे. धन्यवाद. 


 

हे सर्व काही बोलून झाल्यावर , श्रीनिवास रावसाहेब पंतप्रतिनिधी उभे राहिले आणि या सर्व मराठ्मोठ्या भाषणाबद्दल त्यांनी बार्टर फ्रिअर यांचे आभार मानले.

दिनांक : ४ सप्टेंबर १८६५
----------------------------------
संदर्भ :
1) The Speeches and Addresses of Sir H.B.E. Frere - BalKrishna Pitale
2) पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास

- रोहित पवार 
1 टिप्पणी

1 टिप्पणी :