Peshwa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Peshwa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

छत्रपती थोरले शाहू महाराजांना(सातारा) प्राण्यांची शिकार करण्याची आणि पाळीव प्राण्यांची देखील प्रचंड आवड होती असे अनेक पत्रांवरून दिसते. साताऱ्यास त्यांचा शिकारखानाही समृद्ध होता, त्यात बरेच प्राणी होते.

Tiger attack on Chhatrapati Shahu Maharaj



शाहू महाराज एकदा पंढरपूर भागात गेले असता तिथे त्यांनी वाघाच्या शिकारीला जायचे ठरवले, सोबत अनेक सहकारी होते, या सहकाऱ्यांमध्ये साखरोजी यादव हा तरुण नोकर सोबतीला होता. शिकारी दरम्यान वाघाचा हल्ला झाला आणि तो त्यात मारला गेला. 

या दुर्दैवी घटनेनंतर शाहू महाराजांनी इ.स. १७३७ मध्ये त्याच्या वडलांना म्हणजेच केदारजी पाटील यांस कऱ्हाड प्रांतातील नाणेघोल गावातील ५ बिघा जमीन इनाम म्हणून दिली. शाहू महाराजांनी ,आपल्या सहकाऱ्यांनी दिलेले योगदान लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची वृत्ती आणि वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतला असावा असे म्हणता येईल. 


संदर्भ : श्री छत्रपती शाहू महाराज यांची रोजनिशी भाग १ 
- गणेश चिमणाजी वाड, द.बा. पारसनीस

- रोहित पवार

थोरले शाहू महाराज आणि वाघाचा हल्ला

श्री काशी श्रेत्राबद्दल प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रचंड आदरभाव आजही टिकून आहे. तिथे काही पुण्यकर्म केले तर मोक्षप्राप्ती होईल असा समज मध्ययुगातही रूढ होता. 


Maratha built bridge in Kashi Uttarpradesh


नाना फडणीसांच्या काळात काशीजवळ कर्मनाशी नदीवर पूल बांधण्याची कल्पना मनात आली. नानांनी आपले कारकून भास्करपंत कुंटे यांना पुलाचे काम सुरु करण्याबद्दल लिहले. पुलाचा पाया खोदण्यास प्रारंभ झाला. परंतु नदीमध्ये वाळूचा भराव आणि पाण्याचा जोर फार होता. पायाभरणीचे काम काही पुरे होईना, त्यामुळे पूर्वीच्या समजुतीप्रमाणे मांत्रिक बोलवून अनुष्ठाने केली. 

ही गोष्ट नाना फडवीसांना कळली तेव्हा ते म्हणाले ,पुलाचे कामास मांत्रिकी अनुष्ठानाचा काहीही उपयोग होणार नाही. अनुष्ठाने बंद करवली आणि 'बेकर' नावाच्या एका युरोपीय कारागिरास २०००० रुपये देऊन पुलाचे काम सोपवले. पुलाच्या पायातील पाणी काढावयास दोन बंब तयार केले. परंतु ते तिथे लागू झाले नाहीत. तेव्हा त्याने कलकत्त्यावरून कळीचे बंब मागवून काम पूर्ण केले. 
आजकालच्या जमान्यात काम Outsource करून पूर्ण करणे ही संकल्पना रूढ होत आहे, परंतु मध्ययुगातही हा प्रकार अनेकदा दिसून येतो. 

संदर्भ : इतिहाससंग्रह : द. बा. पारसनीस
- रोहित पवार 

जेव्हा मराठे काशीत पूल बांधतात...

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांचे राज्य असताना इंग्रजी भाषेचा प्रसार बराच झाला होता. इंग्रजी बोलणारे - ऐकणारे पुष्कळ लोक होते. बाहेरून एखादा अधिकारी आला तर तो साहजिकच इंग्रजीतुनच संबोधत असे. परंतु एक इंग्रज अधिकारी असाही होऊन गेला ज्याने पुण्यात चक्क मराठीत भाषण दिले. 


Marathi Speech by Englishman

ही गोष्ट आहे १८६५ सालची, पुण्यात त्यावेळेसचे गव्हर्नर 'सर बार्टल फ्रिअर' आले होते. एक समारंभ म्हणून त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते.त्यावेळी अनेक सरदार व बडे लोक दरबारात जमले होते. 

या सर बार्टल फ्रिअर विषयी सविस्तर परत कधीतरी. पण गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारण्या पूर्वीच म्हणजे १८३५ मधेच या बार्टलने हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषा शिकून त्याविषयीच्या परीक्षाही पास झाला होता.तर या दरबारात सर्वांना संबोधण्यासाठी ते पुढे आले आणि मराठीतूनच सुरवात करत म्हणाले - 
"आपण येथे आल्याने आम्हास फार संतोष झाला. आपले येण्याने आपले मुलां माणसाचे व आपले रयतेचे कुशळ आम्हास कळले. आपली महाराणी मालिकामा आझम व्हिकटोरिया यांचे ठायी आपली एकनिष्ठ भक्ती असल्याचे कळून आले. या देशातील राज्यकारभार चालवणारे पुष्कळ गृहस्थ आपल्यास भेटले आणि या देशात सौख्य व आबदानी असण्याविषयी आपले महाराणी साहेबांची फार उत्कंठा आहे"

"आपण पुण्याहून परत जाण्यापुर्वी आपल्याशी आपल्या हिताच्या पुष्कळ गोष्टींविषयी संभाषण करण्याची आमची इच्छा आहे. विद्या म्हणजे केवळ लिहता वाचता येणे इतकेच नाही. लिहिता वाचता आल्यावाचुन व्हावे तितके विद्यासंपादन होते असे नाही. पण विद्यासंपादनास आणखीही साधने आहेत. निरनिराळी ठिकाणे पाहणे व तेथील गुणी लोकांशी संभाषण करणे हे एक आहे. कारण विद्वान असे सर्व लोक एकाच ठिकाणी आढळत नाहीत. बॉम्बे, अहमदाबाद, काशी अशी दुसरी शहरे पुष्कळ माहिती होण्यासारखी आहेत"

"दूरदेश पाहण्यास जावे तर खर्च लागतो परंतु आपले बरोबर जरूर तितकेच लोक घेऊन जाण्याविषयी आलिजा बहादूर शिंदे महाराज व होळकर महाराज यांचा उत्तम कित्ता आपण घेण्यासारखा आहे"

"पहा जर कदाचित आपल्या महाराणी साहेबांचे चिरंजीवांपैकी एकाची स्वारी येथे आली तर त्याजबरोबर त्यांचे भाषेने संभाषण करता येईल असे आपल्यामध्ये तयार असले पाहिजेत"

मी तुमच्याशी येथे अगदी साधेपणाने आणि सत्य तेच बोललो, अगदी जुन्या मित्राप्रमाणे बोललो कारण गेले अनेक वर्ष मी या देशासाठी अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. ब्रिटिश सरकार तुमची काळजी घेण्यास बांधील आहे. धन्यवाद. 


 

हे सर्व काही बोलून झाल्यावर , श्रीनिवास रावसाहेब पंतप्रतिनिधी उभे राहिले आणि या सर्व मराठ्मोठ्या भाषणाबद्दल त्यांनी बार्टर फ्रिअर यांचे आभार मानले.

दिनांक : ४ सप्टेंबर १८६५
----------------------------------
संदर्भ :
1) The Speeches and Addresses of Sir H.B.E. Frere - BalKrishna Pitale
2) पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास

- रोहित पवार 

मराठीत भाषण देणारा इंग्रज


एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.





महादजी शिंदे आणि नाना फडणवीस , दोघेही मराठ्यांच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती. महादजी उत्तरेत रण गाजवत तर नाना फडवणीस पुण्यात फडावर व्यवस्थापनाचं काम करत. त्यामुळे काही वाद -विवाद होणे स्वाभाविक होते.पण दोघांमध्ये काही वितुष्ट येऊन मराठा साम्राज्याचे नुकसान होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते

१५ मार्च १७७९ रोजीच्या पत्रातला हा उल्लेख पहा, महादजी लिहतात :  

सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.

संदर्भ : ऐतिहासिक पत्रबोध - सरदेसाई, लेखांक ५४

- रोहित पवार

शपथक्रिया - महादजी आणि नाना


पानिपतचे महायुद्ध झाले ते अफगाणी अहमदशहा अब्दाली आणि मराठा सदाशिवराव भाऊ यांच्यात. 'अहमदशहा अब्दाली' वयाच्या १६ व्या वर्षीपासूनच इराणचा बादशहा 'नादिरशहाचा' गुलाम होता. नादिरशहाची त्यावर मर्जी होऊन तो लवकरच 'यसवाल' (वयक्तिक अधिकारी) झाला.
पुढे १७३९ साली नादिरशहाने दिल्लीवर स्वारी केली त्यावेळी अब्दालीदेखील त्याच्यासोबत होता. या दरम्यान मुघलांचा दक्खनेतील सुभेदार असलेल्या 'निजाम-उल-मुल्कची' नजर या अब्दालीवर पडली. मुखसामुद्रिक (Facereading) अवगत असणाऱ्या निजाम-उल-मुल्कने भाकीत केले कि, "अब्दालीच्या शरीरावर राजलक्षण आहेत, हा लवकरच बादशहा होईल" ! बादशहा नादिरशहाने हे ऐकल्यावर अब्दालीला बोलवून कट्यारीने त्याच्या दोन्ही कानांचा तुकडा काढला आणि म्हणाला , " तू बादशहा झालास कि यामुळे तुला माझी आठवण होत राहील".

संदर्भ :
*Solstice at Panipat -Uday Kulkarni, P28
*Ahmad Shah Durrani - Ganda Singh , P19
* मूळ संदर्भ तारीख-इ-अहमदशाही 2b

(कुरूप) अहमदशहा अब्दाली