समुद्र मंथनातून  आलेले अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सलग १२  दिवस युद्ध झाले. या दरम्यान हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. पुराणातील कथित कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. नाशिकमध्ये गोदातीरी भरणारा 'सिंहस्थ कुंभमेळा' असतो कारण तो सिंह राशीत येतो. सिंह राशीत गुरु ग्रह असताना गंगा भूतलावर प्रकटल्याने या काळाला 'सिंहस्थ' पर्व म्हटले गेले.


कुंभमेळा - नेट साभार


या पर्वकाळात अनेक आखाडे ,संप्रदाय एकत्रित येऊन विचारमंथन आणि शाहीस्नान करतात. यात मुख्यत्वेकरून नागा साधूंची संख्या जास्त दिसून येते .अतिशय जुनी परंपरा लाभलेल्या या 'सिंहस्थ पर्वाचे' उल्लेख शिवकालीन कागदपत्रातही मिळतात ते असे,

१) १५ सप्टेंबर १६२२ -
"भट जुनारदार को नासिक मालूम केले, आपण गोदातीरी स्नानसंध्या करून साहेवासी द्वा देऊन असतो. आपणास सिंहस्थ पटी दर सिंहस्थी माफ आहे. हाली सिहस्त येऊन गुदरला ते माफीचे खुर्दखत हाली पाहिजे. तरी पटी माफ असे"  (संदर्भ :पसासं १६५)

२) इ.स.१६४७ - "कारकिर्दी मलिक अंबर अमानत व जमा केले. आपण वजिराचे बंद्गीस उभे राहून महालास ताजेखान याजकडे खुर्दखत आणिले. त्याप्रमाणे आपले दुमाला केले. त्याउपरी गेला सिंहस्थ निमे कमावीस स्याहु भोसला व निमे अमल पात्स्याही दिधले. तरी मिरासी आपली आहे"   (संदर्भ :पसासं ५४१)

३) इ.स. १६५९ -
".पंढरपूर, तुळापूर, कोलापूर येथील मूर्ती काडीली. विजापुरात अली पातशाय असतां अफलखान वजिराने हे केले. मार्गशीष पंचमीस शिवाजी भोसला याने महापापी अफजलखान मारिला. मार्गशीस वदी ७ शनिवारी पनाळे घेतले. सिंहस्थ बृहस्पती आला होता." (संदर्भ :पसासं ७९९).म्हणजे शिवाजी महाराजांनी अफझलखानास मारून नंतर अवघ्या १८ दिवसांत पन्हाळा किल्ला  घेतला तेव्हा सिंहस्थ पर्व सुरु होते.


कुंभमेळा -हरिद्वार इ.स. १८५०

शिवकालीन सिंहस्थ पर्वाचा कालनिर्णय खालीलप्रमाणे -
१६२३ सप्टेंबर  ,१६३५ ऑगस्ट,
१६४७ ऑगस्ट , १६५९ जुलै,
१६७१ जुलै  ,१६८३ जून,
१६९५ मे. (संदर्भ : शि.नि. पृ - ९०)


कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र म्हणजे नागा साधू. वेगवेगळे संप्रदाय, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाडय़ांशी जोडले गेलेले असतात. यातील पंथांचे एकमेकांत वाद असले तरी,मात्र कुंभमेळा हा प्रकार विलक्षण नक्कीच आहे,हजारो - लाखो लोक आपल्या श्रद्धेने गंगेत स्नान करतात, अलीकडच्या काळात या कुंभमेळ्यात  परदेशी पर्यटकही मोठय़ा संख्येने  सहभागी होऊ लागले आहेत.अशा या पवित्र सिंहस्थ  कुंभमेळ्याचे उल्लेख शिवकालात आणि त्यानंतरही आढळून येतात.

- रोहित पवार


संदर्भ : 
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १
शिवाजी निबंधावली - न. चिं. केळकर ,द.वि. आपटे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - वि.का. राजवाडे








शिवकालीन 'सिंहस्थ'


          इतिहास हा दंतकथांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या दंतकथांभोवती आकर्षणाचं एक वलय असल्याने त्या कितीही जुन्या असल्या तरी शिळ्या वाटत नाहीत. शिवकाळातही एक प्रसिद्ध दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे १६७० साली 'तानाजी मालुसरे' यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढून कोंढाणा किल्ला (सिंहगड) घेतला (ऐ.पो.पृ- ८३). शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला हा उल्लेख आहे. परंतु सभासद बखरीत "...जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले"(स.ब.पृ-६७) असे लिहले आहे आणि तेच सत्य असावे. पण जरी वरील घोरपडीची घटना सत्य नसली तरी यापूर्वी घोरपडीच्या सहाय्याने गड जिंकण्याचा प्रकार पंधराव्या शतकात (इ.स.१४७०) घडलाय आणि त्याचे पुरावेदेखील मिळतात.

यावेळी भारतात बहामानींची सत्ता होती. महमदशा बहामनी (दुसरा) हा सत्तेवर आला, त्याचा वजीर 'महमूद गावान' हा मोठा पराक्रमी होता. या गावानने दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. तो कोकणात उतरला.पूर्वीच्या एका घटनेचा सूड घेण्यासाठी त्याने 'खेळणा' उर्फ 'विशालगड'वर स्वारी करायचं ठरवलं. हा किल्ला त्यावेळी कोकणातील राजा 'शंकरदेव मोरे' याच्या ताब्यात होता.या शंकररायाचा अंमल समुद्रापर्यंत असून त्याजजवळ तीनशे जहाजांचे आरमारही होते.त्यांचा मदतीने तो मुसलमान व्यापारांस फार उपद्रव देई.(मु.रि. खं१ पृ-२१६).त्याला शह देण्यासाठी महमद गवान पहाडी पायदळ घेऊन 'खेळण्यावर' आला.

मुधोळ संस्थान

कोल्हापूरमध्ये मलकापूरनजीक हा दुर्ग वसला आहे. सह्याद्रीच्या बिकट रांगेतील हा बेलाग आणि नावाप्रमाणेच विशाल असा हा दुर्ग त्याला सहजासहजी जिंकता येईना, मौलाना अबुसयीरला लिहलेल्या पत्रात गवान लिहतो की, "… खेळण्याच्या किल्ल्याला वेढा घातला ,या किल्ल्याची मजबुती आणि शक्ती पाहून माझी खात्री झालीय की हल्ला करून तो आपल्या ताब्यात येणे शक्य नाही "(दुर्ग, पृ -५४०). अनेक महिने गेले तरी किल्ला हाती येत नव्हता. यावेळी महमूद गावानच्या फौजेतील सरदार कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्रांनी एक युक्ती सुचवली, ती म्हणजे घोरपडीच्या सहाय्याने किल्ला चढून जाण्याची. घोरपड हा साधारण पालीसारखा दिसणारा पण आकाराने मोठा असा प्राणी. याच्या फताड्या पायांमुळे आणि मोठ्या नखांमध्ये भिंत घट्ट धरण्याची क्षमता असते.

ठरल्याप्रमाणे एका काळ्याकभिन्न रात्री काही घोरपडींच्या कमरेला दोर बांधून हे पितापुत्र मोजक्या सैन्यानिशी किल्ल्यावर चढून गेले आणि आतून बंद असलेला किल्ल्याचा दरवाजा उघडला. बाहेर महमूद गावान दबा धरून बसले होते . दरवाजा उघडताच त्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तो हस्तगत केला. मात्र लढाईदरम्यान कर्णसिंह धारातीर्थी पडले.(मु.सं.इ परि, पृ१५).पण त्यांच्या पराक्रमाने दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असणारा 'खेळणा' किल्ला मात्र ताब्यात  आला.

एक कल्पनाचित्र 

या प्रसंगानंतर बादशाह महमदशहाने कर्णसिंहाचा पुत्र 'भीमसिंहाला' दिलेल्या फर्मानात स्पष्ट उल्लेख आहे की, 'सोसमार' म्हणजे 'घोरपड' घेऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या कंबरेस दोर बांधून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या 'खिलना' किल्याच्या कांगोऱ्यावर त्यांना पाठवले आणि किल्ल्याचा दरवाजा उघडला..." यापुढे तो असेही लिहतो की, "...या लढाईत करणसिंघ कामास आला. या कुलाच्या शाश्वतीसाठी आणि चाकरीसाठी ८४ गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फर्मावतो.याशिवाय रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो तसेच त्यांना 'राणा' ऐवजी 'राजा घोरपडेबहाद्दर ' हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो, ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे" .फार्मानावर तारीख आहे -२२ ऑक्टोबर १४७१. (मु.सं.इ परि, पृ१६). सदर फर्मान बनावट असल्याचे गजानन मेहेंदळे यांचे मत आहे.

याशिवाय करवीर सरदारांच्या कैफियती मधे घोरपडीचा आलेला हा उल्लेख, "..असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिसी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन "घोरपडे" म्हणोन किताब दिल्हे कारण हेच कि जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवतात...निरुपाय असले ठिकाणीसुद्धा 'घोरपडीचे' कंबरेस दोरी बांधून आत्मादेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब आबदागिरी वगैरे चिन्हे द्यावी,असी योजना करून दिल्हे." (क.स.कै, पृ-६९)

कर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजीचे पणतू. भोसाजीचे वंशज ते भोसले. वरील घटनेनंतर 'भीमसिंह' हा 'घोरपडे' बनला तर देवगिरीकडील 'शुभकृष्ण' मात्र 'भोसले'च राहिला [हेच छ.शिवाजी महाराजांचे घराणे](मु.सं.इ परि,पृ१७०-१७४).'पुढे बहमनी सत्तेचे पाच तुकडे पडून पाच शाह्या वेगळ्या झाल्या त्यापैकी एक आदिलशाही उदयास आली. तेव्हा या पराक्रमी घोरपडे मंडळींनी आदिलशाहीला साथ दिली.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या घराण्याने स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली.'संताजी घोरपडे' हे त्यापैकीच एक !

* घोरपडीच्या मदतीने भिंतीवर चढून जानं कितपत शक्य आहे याची प्रत्यक्षात पडताळणी आम्ही केलेली नाही. पण मिळालेले संदर्भ पाहता हा लेख आपल्यासमोर मांडला आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.

||लेखनसीमा||
 रोहित पवार


संदर्भ : 
ऐतिहासिक पोवाडे - य.न.केळकर
सभासद बखर - हेरवाडकर
मुसलमानी रियासत - गो.स.सरदेसाई
करवीर सरदारांच्या कैफियती - स.मा.गर्गे
मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास- द.वि.आपटे.
मंतरलेला इतिहास - हर्षद सरपोतदार 
दुर्ग - सतीश अक्कलकोट 











घोरपडीची कुळकथा


शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती.या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने 'लष्करी' होते.

इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला.  तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली. 

इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा 'दाहीर' याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) - याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.

मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६)  - नुसती लुट न करता इथेच  सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.

अल्लाउद्दीन खल्जी- (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.

मुहम्मद तुघलक - (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर  एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.

तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.

बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.

अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी  चालू ठेवली.

शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.

Shivpurvkalin Maharashtra
देवगिरी किल्ला

शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.महाराष्ट्रात सातवाहन- वाकाटक - राष्ट्रकुट - चालुक्य - शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु -

सातवाहन - (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.

वाकाटक - (इ.स. २४८ ते  ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.

चालुक्य - (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.

राष्ट्रकुट - (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे  यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे-ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली.

  सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.
शिलाहार - (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले.  कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला

यादव -  (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते.१२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही.

       रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) 'अल्लाउद्दिन खल्जी' देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र 'शंकरदेवराय' दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.

यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार

संदर्भ :
शककर्ते शिवराय (खंड १) - विजयराव देशमुख
श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
मुसलमानपुर्व महाराष्ट्र - वा.कृ. भावे
शिवकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भावे

शिवपुर्वकाळ

शिवजन्मतारखेचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे इस २००० साली यश आले असले या वादाची नेमकी करणे कोणती ? हे इतिहास अभ्यासक नात्याने समजून घेणे आवश्यक वाटते, तर त्यावेळी शिवजन्माच्या मुद्द्यावरून मुख्यत्वे २ गट पडलेले होते , एक म्हणजे वैशाखवादी जन्मतिथी मानणारा आणि दुसरा फाल्गुनवादी.

वैशाखवादी - वैशाख शुद्ध द्वितीया /पंचमी शके १५४९ (८/१० एप्रिल १६२७) 
फाल्गुनवादी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०)





 
 > इस १८९६  १८९५ साली राष्ट्रीय लोकसंघटनेच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशउत्सव आणि शिवजयंती  सार्वजनिकरित्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाची बहुतेक साधने उजेडात आली नव्हती.अशा अवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांवरून वैशाख शुद्ध  द्वितीया शके १५४९ असे एकमताने गृहीत धरून शिवजयंतीला सुरवात झाली.

इस १९१६  यानंतर जे महत्वाचं साधन समोर आलं ते म्हणजे 'जेधे शकावली' , जी लोकमान्य टिळकांना दाजीकाका जेधे देशमुख यांच्याकरून प्राप्त झाली , या जेधे शकावली मध्ये शिवजन्माची तिथी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ अशी दिलेली होती.हे दोन वेगवेगळे पुरावे ('चिटणीस बखर' विरुद्ध 'जेधे शकावली' ) जेव्हा समोर आले तेव्हा वादाला प्रारंभ झाला.

त्यातच तंजावरच्या बृहद्दीश्वर मंदिरातील एक शिलालेख उजेडात आला त्यात देखिल फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१ असाच उल्लेख सापडला. इथून शिवजन्मतिथीच्या इतिहास संशोधनाला सुरवात झाली.

> इस १९१८ - अशा अवस्थेमधे सदाशिव दिवेकर यांनी तंजावर येथे कवी परमानंद याने लिहलेला 'शिवभारत' हा ग्रंथ शोधून काढला. मुळ संस्कृत ग्रंथ व्यवस्थितपणे संपादन करून झाल्यावर या ग्रंथात देखील शिवजन्मतिथी ही फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१  अशी नोंद सापडली. संपादना दरम्यान अस लक्षात आलं की ग्रंथाचा मुळ लेखक परमानंद शिवाजीराजांना समकालीन, निकटवर्तीय होता.पुढे  'दत्तोपंत आपटे' यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं की याने आपलं काव्य शिवाजीराजांच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहलं.त्यामुळे शिवभारत ग्रंथाला अधिक महत्व प्राप्त झालं 

इस १९२५ - ३ फेब्रुवारी १९२५ च्या 'केसरी' मध्ये का. ना. साने, द. वि. आपटे, द. वा. पोतदार इत्यादी बारा जणांनी नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

इस १९२५-३५ - प्रख्यात इतिहासकार गौरीशंकर ओझा, यांनी ब्यावर (राजस्थान) येथील एका प्रख्यात ज्योतिष कुटुंबाच्या खासगी संग्रहातून महाराजांची कुंडली शोधून काढली.पुढे राजस्थानातच बनेडा, बिकानेर या ठिकाणी शिवछत्रपतींच्या आणखी २ कुंडल्या सापडल्या , या सर्व कुंडल्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हीच तिथी आढळून आली. फाल्गुनवादी अभ्यासकांनी आपल्याकडील पुरावे कमी पडतात म्हणून या  शिवछत्रपतींच्या कुंडल्या पुढे आणल्या.


इस १९६६ - महाराष्ट्र सरकारने शिवजन्मतिथीचा हा वाद मिटवण्यासाठी ३ नोव्हेंबर १९६६ रोजी इतिहासतज्ज्ञाची एक समिती नेमली. दोन्ही पक्षाचे लोकांना तडजोड करायला सांगितली. परंतु या समिती सभासदांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे शासनाने जुन्या शिवजन्म तिथीत कोणताही बदल सध्या करण्याचे नाकारून तीच शिवजन्मतिथी चालू ठेवली.

इस १९९५ - त्यानंतर २८ वर्षानंतर म्हणजे १९९५ मध्ये फाल्गुनवादी अभ्यासकांनी शासनाकडे नव्या शिवजन्मतिथीचा आग्रह धरला. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली.याअंती २००० साली नवीन तिथी (फाल्गुनवादी) शासनाने मान्य केली.परंतु तिथी ऐवजी तारखेला प्राधान्य देऊन १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.

टीप:
जुलियन कालगणने प्रमाणे १९ फेब १६३० (ही कालगणना कालबाह्य असल्यामुळे आपण सध्या वापरत नाही)
ग्रेगोरियन कालगणने प्रमाणे १ मार्च १६३० (आपण सध्या हीच कालगणना दैनंदिन व्यवहारात वापरतो)


सारांश -  फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) हा प्रवाद मांडणारी महत्त्वाची साधने म्हणजे समकालीन कवी परमानंदाचे 'शिवभारत', जेधे शकावली, शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावली, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात सापडलेला शिलालेख आणि राजस्थान मध्ये सापडलेल्या कुंडल्या .यावरून फाल्गुनवादी शके १५५१ ची तिथी अधिक विश्वासनीय मान्य केले गेले.

अर्थात हा संपूर्ण वाद , काही इतिहास संशोधकांच्या अहंकारी प्रवृत्तीचा किंवा साधनांतील उल्लेखांची तफावत यामधला होता . परंतु आजही शिवजन्माचा वाद इथेच न संपता नसून पुढे देखील एका वादाला आरंभ झालाय तो म्हणजे शिवजयंती साजरी करावी तिथी का तारखेप्रमाणे ?


|| लेखन सीमा ||
   रोहित पवार

संदर्भ - 
शिवभारत  (कवींद्र परमानंदकृत) - स.म.दिवेकर
जेधे शकावली - अ.रा.कुलकर्णी , डायमंड प्रकाशन
शिवचरित्रप्रदीप -द॰ वि॰ आपटे व सदाशिव दिवेकर, भा.इ.सं.म प्रकाशन
नरहर कुरुंदकर यांचे व्याखान (नांदेड)

शिवजयंतीचा 'इतिहास'


सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं  इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.

Jawali More and Shivaji Maharaj
जावळीचे खोरे
 मोरे घराणे :
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा  हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.

या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते.  महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर), दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फ भिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .

वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंह व रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावाला पाठविलेले पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सारांशानुसार 'चंद्रराव' येसाजीचे गादीवर येणे ही घटना १८ जून १६४६ नंतर घडली आहे असा निष्कर्ष निघतो. चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शिवाजी महाराजांची मदत झाली.पुढे ..१६४८ मध्ये स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना उद्देशून एक भाष्य केल्याचे शिवभारतात सांगितले आहे (अध्याय १३). त्यात  त्यांनी म्हटले आहे की,

"लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्रारावाची तिथे स्थापना केली." 

याचाच अर्थ ,येसाजीला(चंद्रराव) दत्तक घेताना आदिलशाहकडून संमती घेतली गेली नव्हती. त्यामुळे आदिलशाह नाराज होणे स्वाभाविकच होते. त्यातच भर म्हणून इ.स.१६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे (आदिलशाही सुभेदार) असलेल्या वाई परगण्यातला होता. त्या प्रसंगी अफझलखान याने कान्होजी जेध्यांना पत्र पाठवले होत.

चंद्रराऊ कदीम मयत जालियावरी (जावळी) गैरी लोकी पैस करून बळकाविले  आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे" - अफजलखान

 याचा अर्थ असा की, कदीम (पूर्वीचा) चंद्रराव मरण पावल्यावर जावळी गैरी लोकी  पैस करून (घुसखोरी करून) बळकाविले आहे व म्हणून त्यांच्याविरुद्ध नामजादी केली आहे. (नेमलेले आहे) वरील उताऱ्यावरून, 'गैरी लोक' या शब्दांनी चंद्रराव येसाजी व त्याचे साथीदार अभिप्रेत असावेत. येसाजीची जावळीच्या गादीवरील स्थापना आदिलशहाच्या परवानगीशिवाय झालेली होती हेच अफझलखानाच्या जावळीवरील स्वारीचे कारण होते. परंतु काही कारणास्तव ही स्वारी सुरु होण्याआधीच संपली.

पुढे शिवाजीराजे आणि चंद्रराव यांत वाद होत गेले आणि शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे भाग पडले याबद्दल उत्तरार्ध मध्ये सविस्तर लिहले आहे.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी खंड २) | संपादक : अविनाश सोवनी
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शिवाजी आणि चंद्रराव मोरे - वैद्य चिंतामण विनायक 
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर

जावळीचे मोरे प्रकरण-पूर्वार्ध

एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, अश्या परिस्थितीत जावळीकर चंद्ररावाला एकतर शिवाजीराजांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार अथवा पुढे कधीनाकधी या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघड होते. या मोऱ्यांनी महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी भाग व बहुतेक सातारा विभाग काबीज केला होता. कोकण व घाटमाथा यावरील सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.या कारणांमुळेच महाराजांचे जावळीकडे प्रारंभापासून लक्ष होते.


Jawaliche More


इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती हे आपण मागील प्रकरणात पहिले.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,

१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.

एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो. समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.

लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-

"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."



यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली.  शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)

चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.

जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शककर्ते शिवराय - विजय देशमुख

जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध