Raigad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Raigad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर यादिवशी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला.या दिवसाची आठवण म्हणून अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ठीकठिकाणी साजरा केला जातो. आज ३५० वर्षाहूनही अधिक काळ उलटला तरी 'छत्रपती शिवाजी महाराज' ह्या नावाचं गारुड महाराष्ट्रातल्या कानाककोपऱ्यात प्रत्येक माणसावर संस्कार करत आलंय.परंतु या राज्याभिषेकाचे प्रयोजन काय होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि त्यामागील प्रेरणा समजून घेणे आवश्यक आहे.


शिवपूर्वकाळात हिंदुस्थानात यावनी सत्ता अधिराज्य गाजवत होत्याउत्तरेत मुघल तर दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा अशा बलशाली सत्ता राज्य करत होत्याया सत्तांचे स्वरूप हे प्रामुख्याने 'लष्करीहोते त्यामुळे स्थानिकांमधे या सत्ताधीशांविषयी असंतोषाची भावना होतीअशातच एका जहागीरदाचा पुत्र या अन्य्याया विरुद्ध बंड उगारतो आणि स्थानिकांमधे 'स्व'राज्याची भावना निर्माण करतो हि गोष्ट प्रवाहाविरुद्धच होतीराज्याभिषेकाची भावना व्यक्त करताना बखरकार लिहतो कि"राजे सिंहासनारूढ झाले , ह्या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला ही गोष्ट सामान्य जाली नाही"राज्याभिषेकाचे महत्व सांगताना जेष्ठ इतिहास संशोधक 'वा.सीबेंद्रेआपल्या 'श्रीशिवराजाभिषेकग्रंथात लिहतात किछत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिकराजकीय आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते "


राज्याभिषेक हा एक संस्कार आहे, तो आवश्यक आहेच परंतु केवळ राज्याभिषेक हि स्वराज्याची फलश्रुती नव्हे. अॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात हिंदुस्थानात येऊन गेला. चौल बंदरानजीक त्याचे एका मराठा अधिकाऱ्याशी जे संभाषण झाले ते त्याने त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे. तो मराठा अधिकारी सांगतो कि, "सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची शिवरायांची मनिषा आहे" . हे होतं शिवाजी महाराजांचं स्वप्न जे पुढे नानासाहेब पेशव्यांनी पूर्ण केले. पूर्वेकडील देशांत शिवाजी महाराज सर्वात महान राजे असून त्यांच्या गुणवत्तेची तुलना स्वीडनचा महान राजा 'गुस्तावस एडोल्फस' शी करावी लागेल असे कॅरे लिहतो. याशिवाय समकालिन पोर्तुगीज आणि इंग्रजांचा पत्रव्यवहार पाहिल्यास शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, ज्युलिअस सीझर या महान सेनानींशी केल्याचे आढळते.

वेदमूर्ती गागाभट्टांनी शिवाजीरायांच्या मस्तकी सार्वभौमत्वाच्या धारा धरल्या. छत्र घारण करणे, नाणी पाडणे आणि नवीन शक सुरु करणे ही सार्वभौमत्वाची तीनही चिन्हे महाराजांनी अमलात आणली.
राज्याभिषेकावेळी राज्यव्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले. याची सुरवात केली ती भाषा शुद्धीकरणा पासून .शिवरायांनी शब्दकोश (dictionary) तयार केला हे फार कमी लोकांना माहित असेल. ३०० वर्ष यावनी राजवटीखाली स्थानिकांवर, राज्यव्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता.यावर उपाय म्हणुन फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. ठरल्यानुसार इ.. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. अशा कोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात.शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातूनच दिसून येते.


राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी एका महत्वाकांक्षी मोहिमेला प्रारंभ केला तो म्हणजे 'दक्षिण दिग्विजय' .यावेळी चेन्नईच्या दक्षिण भागातील 'जिंजी' हा महत्त्वाचा किल्ला महाराजांनी स्वराज्यात आणला. जिंजी ते रायगड या परतीच्या प्रवासात 'समोत्तिपेरूमल' देवालया नजीक महाराजांचा मुक्काम होता. बहमनी सत्तांनी उध्वस्त केलेल्या या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना शिवाजीराजांनी केली. याठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेस भव्य दीपोत्सवाची प्रथा महाराजांनी पुन्हा सुरु केली जी दीर्घकाळ बंद पडली होती. हा दीपोत्सव आजही साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघी दक्षिण काबीज करायला निघालेल्या औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. यावेळी जिंजीच्या किल्ल्याने शिवपुत्र राजाराम महाराजांना तब्बल ८ वर्षे आश्रय दिला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाची हि फलश्रुतीच म्हणावी लागेल.

स्त्रीचा बदअमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाला तडक चौरंगाची शिक्षा सुनावणारे शिवराय , जिवाजीपंताने कामात दिरंगाई केल्यावर ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केली जाणार नाही असे खडसावणारे शिवराय, रयतेच्या पिकाच्या देठासही धक्का लावू नका अशी सैन्यास तंबी देणारेही शिवराय. अशा अनेक विविध पैलूंनी नटलेले शिवाजी महाराजांचे चरित्र अद्वितीयच आहे. परंतु आज शिवचरित्रातुन प्रेरणा घेण्यापेक्षा समाजात जातीभेद पेरला जातोय, दुर्गसंवर्धनापेक्षा पुतळ्यांना महत्व दिले जाते , सोशल मिडियावर मांडला जाणारा इतिहास शहानिशा न करता खरा मानला जातो, हि खरी शोकांतिका. आज आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय अस्मितेचा जागर जिद्दीने केला जातोय मग तीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेकाच्या निमित्ताने अस्मितेचे अग्निपुष्प फुलले त्याची आठवण आजच्या दिवशी करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

बहुत काय लिहावे
- रोहित पवार

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने...