शिवभारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवभारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


इंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी 'न्यू इंग्लिश कंपनी' सुरु केली. याचबरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली. आता  या नव्या कंपनिला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व  सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन 'सर विलियम नॉरिसला' बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले. पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकीली वाया गेली, पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली.
२५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला. २२ फेब १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला. याठिकानी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापार्याची वखार होती तिथे मराठयांनी धमाकुळ घातला होता. "मोठेमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत, इतका त्यांना मराठयांचा धाक वाटत" ,असे त्याने नमुद केले आहे.
मराठयांचे सातारा,पन्हाळगड इत्यादि किल्ले जिंकन्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते. औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिति जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला. बादशाह औरंगज़ेब नुकताच इथे राहुन गेला होता. त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली. छावणीभोवतीचा संरक्षण 'खंदक' पाहुन नॉरिसला हसु आले. तो म्हणतो, 'हा कसला खंदक ! सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल.
संदर्भ : Norris Embassy to Aurangjeb - Haridaas

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक !


          इतिहास हा दंतकथांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या दंतकथांभोवती आकर्षणाचं एक वलय असल्याने त्या कितीही जुन्या असल्या तरी शिळ्या वाटत नाहीत. शिवकाळातही एक प्रसिद्ध दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे १६७० साली 'तानाजी मालुसरे' यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढून कोंढाणा किल्ला (सिंहगड) घेतला (ऐ.पो.पृ- ८३). शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला हा उल्लेख आहे. परंतु सभासद बखरीत "...जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले"(स.ब.पृ-६७) असे लिहले आहे आणि तेच सत्य असावे. पण जरी वरील घोरपडीची घटना सत्य नसली तरी यापूर्वी घोरपडीच्या सहाय्याने गड जिंकण्याचा प्रकार पंधराव्या शतकात (इ.स.१४७०) घडलाय आणि त्याचे पुरावेदेखील मिळतात.

यावेळी भारतात बहामानींची सत्ता होती. महमदशा बहामनी (दुसरा) हा सत्तेवर आला, त्याचा वजीर 'महमूद गावान' हा मोठा पराक्रमी होता. या गावानने दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. तो कोकणात उतरला.पूर्वीच्या एका घटनेचा सूड घेण्यासाठी त्याने 'खेळणा' उर्फ 'विशालगड'वर स्वारी करायचं ठरवलं. हा किल्ला त्यावेळी कोकणातील राजा 'शंकरदेव मोरे' याच्या ताब्यात होता.या शंकररायाचा अंमल समुद्रापर्यंत असून त्याजजवळ तीनशे जहाजांचे आरमारही होते.त्यांचा मदतीने तो मुसलमान व्यापारांस फार उपद्रव देई.(मु.रि. खं१ पृ-२१६).त्याला शह देण्यासाठी महमद गवान पहाडी पायदळ घेऊन 'खेळण्यावर' आला.

मुधोळ संस्थान

कोल्हापूरमध्ये मलकापूरनजीक हा दुर्ग वसला आहे. सह्याद्रीच्या बिकट रांगेतील हा बेलाग आणि नावाप्रमाणेच विशाल असा हा दुर्ग त्याला सहजासहजी जिंकता येईना, मौलाना अबुसयीरला लिहलेल्या पत्रात गवान लिहतो की, "… खेळण्याच्या किल्ल्याला वेढा घातला ,या किल्ल्याची मजबुती आणि शक्ती पाहून माझी खात्री झालीय की हल्ला करून तो आपल्या ताब्यात येणे शक्य नाही "(दुर्ग, पृ -५४०). अनेक महिने गेले तरी किल्ला हाती येत नव्हता. यावेळी महमूद गावानच्या फौजेतील सरदार कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्रांनी एक युक्ती सुचवली, ती म्हणजे घोरपडीच्या सहाय्याने किल्ला चढून जाण्याची. घोरपड हा साधारण पालीसारखा दिसणारा पण आकाराने मोठा असा प्राणी. याच्या फताड्या पायांमुळे आणि मोठ्या नखांमध्ये भिंत घट्ट धरण्याची क्षमता असते.

ठरल्याप्रमाणे एका काळ्याकभिन्न रात्री काही घोरपडींच्या कमरेला दोर बांधून हे पितापुत्र मोजक्या सैन्यानिशी किल्ल्यावर चढून गेले आणि आतून बंद असलेला किल्ल्याचा दरवाजा उघडला. बाहेर महमूद गावान दबा धरून बसले होते . दरवाजा उघडताच त्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तो हस्तगत केला. मात्र लढाईदरम्यान कर्णसिंह धारातीर्थी पडले.(मु.सं.इ परि, पृ१५).पण त्यांच्या पराक्रमाने दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असणारा 'खेळणा' किल्ला मात्र ताब्यात  आला.

एक कल्पनाचित्र 

या प्रसंगानंतर बादशाह महमदशहाने कर्णसिंहाचा पुत्र 'भीमसिंहाला' दिलेल्या फर्मानात स्पष्ट उल्लेख आहे की, 'सोसमार' म्हणजे 'घोरपड' घेऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या कंबरेस दोर बांधून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या 'खिलना' किल्याच्या कांगोऱ्यावर त्यांना पाठवले आणि किल्ल्याचा दरवाजा उघडला..." यापुढे तो असेही लिहतो की, "...या लढाईत करणसिंघ कामास आला. या कुलाच्या शाश्वतीसाठी आणि चाकरीसाठी ८४ गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फर्मावतो.याशिवाय रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो तसेच त्यांना 'राणा' ऐवजी 'राजा घोरपडेबहाद्दर ' हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो, ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे" .फार्मानावर तारीख आहे -२२ ऑक्टोबर १४७१. (मु.सं.इ परि, पृ१६). सदर फर्मान बनावट असल्याचे गजानन मेहेंदळे यांचे मत आहे.

याशिवाय करवीर सरदारांच्या कैफियती मधे घोरपडीचा आलेला हा उल्लेख, "..असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिसी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन "घोरपडे" म्हणोन किताब दिल्हे कारण हेच कि जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवतात...निरुपाय असले ठिकाणीसुद्धा 'घोरपडीचे' कंबरेस दोरी बांधून आत्मादेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब आबदागिरी वगैरे चिन्हे द्यावी,असी योजना करून दिल्हे." (क.स.कै, पृ-६९)

कर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजीचे पणतू. भोसाजीचे वंशज ते भोसले. वरील घटनेनंतर 'भीमसिंह' हा 'घोरपडे' बनला तर देवगिरीकडील 'शुभकृष्ण' मात्र 'भोसले'च राहिला [हेच छ.शिवाजी महाराजांचे घराणे](मु.सं.इ परि,पृ१७०-१७४).'पुढे बहमनी सत्तेचे पाच तुकडे पडून पाच शाह्या वेगळ्या झाल्या त्यापैकी एक आदिलशाही उदयास आली. तेव्हा या पराक्रमी घोरपडे मंडळींनी आदिलशाहीला साथ दिली.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या घराण्याने स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली.'संताजी घोरपडे' हे त्यापैकीच एक !

* घोरपडीच्या मदतीने भिंतीवर चढून जानं कितपत शक्य आहे याची प्रत्यक्षात पडताळणी आम्ही केलेली नाही. पण मिळालेले संदर्भ पाहता हा लेख आपल्यासमोर मांडला आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.

||लेखनसीमा||
 रोहित पवार


संदर्भ : 
ऐतिहासिक पोवाडे - य.न.केळकर
सभासद बखर - हेरवाडकर
मुसलमानी रियासत - गो.स.सरदेसाई
करवीर सरदारांच्या कैफियती - स.मा.गर्गे
मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास- द.वि.आपटे.
मंतरलेला इतिहास - हर्षद सरपोतदार 
दुर्ग - सतीश अक्कलकोट 











घोरपडीची कुळकथा

शिवजन्मतारखेचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे इस २००० साली यश आले असले या वादाची नेमकी करणे कोणती ? हे इतिहास अभ्यासक नात्याने समजून घेणे आवश्यक वाटते, तर त्यावेळी शिवजन्माच्या मुद्द्यावरून मुख्यत्वे २ गट पडलेले होते , एक म्हणजे वैशाखवादी जन्मतिथी मानणारा आणि दुसरा फाल्गुनवादी.

वैशाखवादी - वैशाख शुद्ध द्वितीया /पंचमी शके १५४९ (८/१० एप्रिल १६२७) 
फाल्गुनवादी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०)





 
 > इस १८९६  १८९५ साली राष्ट्रीय लोकसंघटनेच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशउत्सव आणि शिवजयंती  सार्वजनिकरित्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाची बहुतेक साधने उजेडात आली नव्हती.अशा अवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांवरून वैशाख शुद्ध  द्वितीया शके १५४९ असे एकमताने गृहीत धरून शिवजयंतीला सुरवात झाली.

इस १९१६  यानंतर जे महत्वाचं साधन समोर आलं ते म्हणजे 'जेधे शकावली' , जी लोकमान्य टिळकांना दाजीकाका जेधे देशमुख यांच्याकरून प्राप्त झाली , या जेधे शकावली मध्ये शिवजन्माची तिथी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ अशी दिलेली होती.हे दोन वेगवेगळे पुरावे ('चिटणीस बखर' विरुद्ध 'जेधे शकावली' ) जेव्हा समोर आले तेव्हा वादाला प्रारंभ झाला.

त्यातच तंजावरच्या बृहद्दीश्वर मंदिरातील एक शिलालेख उजेडात आला त्यात देखिल फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१ असाच उल्लेख सापडला. इथून शिवजन्मतिथीच्या इतिहास संशोधनाला सुरवात झाली.

> इस १९१८ - अशा अवस्थेमधे सदाशिव दिवेकर यांनी तंजावर येथे कवी परमानंद याने लिहलेला 'शिवभारत' हा ग्रंथ शोधून काढला. मुळ संस्कृत ग्रंथ व्यवस्थितपणे संपादन करून झाल्यावर या ग्रंथात देखील शिवजन्मतिथी ही फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१  अशी नोंद सापडली. संपादना दरम्यान अस लक्षात आलं की ग्रंथाचा मुळ लेखक परमानंद शिवाजीराजांना समकालीन, निकटवर्तीय होता.पुढे  'दत्तोपंत आपटे' यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं की याने आपलं काव्य शिवाजीराजांच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहलं.त्यामुळे शिवभारत ग्रंथाला अधिक महत्व प्राप्त झालं 

इस १९२५ - ३ फेब्रुवारी १९२५ च्या 'केसरी' मध्ये का. ना. साने, द. वि. आपटे, द. वा. पोतदार इत्यादी बारा जणांनी नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

इस १९२५-३५ - प्रख्यात इतिहासकार गौरीशंकर ओझा, यांनी ब्यावर (राजस्थान) येथील एका प्रख्यात ज्योतिष कुटुंबाच्या खासगी संग्रहातून महाराजांची कुंडली शोधून काढली.पुढे राजस्थानातच बनेडा, बिकानेर या ठिकाणी शिवछत्रपतींच्या आणखी २ कुंडल्या सापडल्या , या सर्व कुंडल्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हीच तिथी आढळून आली. फाल्गुनवादी अभ्यासकांनी आपल्याकडील पुरावे कमी पडतात म्हणून या  शिवछत्रपतींच्या कुंडल्या पुढे आणल्या.


इस १९६६ - महाराष्ट्र सरकारने शिवजन्मतिथीचा हा वाद मिटवण्यासाठी ३ नोव्हेंबर १९६६ रोजी इतिहासतज्ज्ञाची एक समिती नेमली. दोन्ही पक्षाचे लोकांना तडजोड करायला सांगितली. परंतु या समिती सभासदांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे शासनाने जुन्या शिवजन्म तिथीत कोणताही बदल सध्या करण्याचे नाकारून तीच शिवजन्मतिथी चालू ठेवली.

इस १९९५ - त्यानंतर २८ वर्षानंतर म्हणजे १९९५ मध्ये फाल्गुनवादी अभ्यासकांनी शासनाकडे नव्या शिवजन्मतिथीचा आग्रह धरला. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली.याअंती २००० साली नवीन तिथी (फाल्गुनवादी) शासनाने मान्य केली.परंतु तिथी ऐवजी तारखेला प्राधान्य देऊन १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.

टीप:
जुलियन कालगणने प्रमाणे १९ फेब १६३० (ही कालगणना कालबाह्य असल्यामुळे आपण सध्या वापरत नाही)
ग्रेगोरियन कालगणने प्रमाणे १ मार्च १६३० (आपण सध्या हीच कालगणना दैनंदिन व्यवहारात वापरतो)


सारांश -  फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) हा प्रवाद मांडणारी महत्त्वाची साधने म्हणजे समकालीन कवी परमानंदाचे 'शिवभारत', जेधे शकावली, शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावली, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात सापडलेला शिलालेख आणि राजस्थान मध्ये सापडलेल्या कुंडल्या .यावरून फाल्गुनवादी शके १५५१ ची तिथी अधिक विश्वासनीय मान्य केले गेले.

अर्थात हा संपूर्ण वाद , काही इतिहास संशोधकांच्या अहंकारी प्रवृत्तीचा किंवा साधनांतील उल्लेखांची तफावत यामधला होता . परंतु आजही शिवजन्माचा वाद इथेच न संपता नसून पुढे देखील एका वादाला आरंभ झालाय तो म्हणजे शिवजयंती साजरी करावी तिथी का तारखेप्रमाणे ?


|| लेखन सीमा ||
   रोहित पवार

संदर्भ - 
शिवभारत  (कवींद्र परमानंदकृत) - स.म.दिवेकर
जेधे शकावली - अ.रा.कुलकर्णी , डायमंड प्रकाशन
शिवचरित्रप्रदीप -द॰ वि॰ आपटे व सदाशिव दिवेकर, भा.इ.सं.म प्रकाशन
नरहर कुरुंदकर यांचे व्याखान (नांदेड)

शिवजयंतीचा 'इतिहास'