रघुनाथपंथ हणमंते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रघुनाथपंथ हणमंते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इसवी सनाच्या सातव्या शतकात परकीय शक्तींचे भारतात आगमन झाले. यामध्ये प्रामुख्याने अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले. बाराव्या शतकात 'अल्लाउद्दिन खिल्जी' याने महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचा गरुडध्वज उध्वस्त केला, त्यामुळे पुढची सुमारे ३०० वर्ष यावनी राजवटींखाली जनता भरडून निघाली. यादरम्यान फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. मराठी भाषेत फ़ार्सी शब्दांचा सुळसुळात झालेला होता. मुळ संस्कृतप्रचुर भाषा विलयास चालली होती. 

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश आणि संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.परंतु शिवकाळातही दैनंदिन व्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता. लोकांनीतर आपल्या मुलांची नावेसुद्धा रुस्तुमराव, सुल्तानराव ठेवायला सूरवात केली होती. यावर उपाय म्हणुन राज्यव्यवहारात आढळुन येणार्या फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 

राज्यव्यवहार कोश सुपूर्द करतानाचे काल्पनिक चित्र , सौजन्य - पराग घळसासी


इ.स १६७४ साली हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारा मंगल सोहळा पार पडला,शिवरायांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्यांनी 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. यापुर्वी म्हणजे इस १६६५ साली पुरंदरतहा दरम्यान रघुनाथपंत हणमंते यांना शिवाजीराजांनी 'पंडितराव' हा किताब दिला होता. योजना ठरल्यानुसार इ.स. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. रघुनाथपंत दक्षिणदिग्विजय मोहिमेत गुंतले असल्याने त्यांनी हे काम आपला हस्तक 'धुंडीराज लक्ष्मण व्यास' याकड़े सोपवले. 

शिवाजी राजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी दिलेली आज्ञा आणि त्याबद्दलचा राज्यव्यवहारकोश मधील उपोद्घात आलेला उल्लेख असा, 
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणिम् |
नृपव्याहार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ||

अर्थ - या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छद केल्यानंतर सूर्यवंशाला ललाभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी राजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पध्दतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.

'द ग्रेट मुघल' या ग्रंथाचा लेखक अर्ली इब्राहीम लिहतो कि, A Significant aspect of Shivaji's rule was his attempt to revive ancient Hindu political tradition and court conventions to introduce Marathi in place of Persian as the court language. He revived Sanskrit administrative nomenclature and compiled a dictionary of official terms- the Rajya Vyavhar Kosh - to facilitate the change over.

सुमारे १३०० पेक्षा अधिक शब्दांचा एक कोश तयार झाला. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत. उदा. गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक , गरम-उष्ण. आपली मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हा कोश रचला, तसेच यादरम्यान 'शिवाकौदर्य' आणि 'करणकौस्तुभ' असे संस्कृत ग्रंथ देखील लिहून घेतले. राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात. शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातून दिसून येते.


-रोहित पवार


संदर्भ: 
राज्यव्यवहारकोश - संपादक : अ.दा. मराठे
स्वधर्म - निनाद बेडेकर
The Great Mughal- Arlie Embrahim
चित्र सौजन्य - पराग घळसासी


शिवरायांचा एक अपरिचित प्रकल्प