चंद्रराव मोरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रराव मोरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं  इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.

Jawali More and Shivaji Maharaj
जावळीचे खोरे
 मोरे घराणे :
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा  हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.

या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते.  महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर), दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फ भिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .

वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंह व रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावाला पाठविलेले पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सारांशानुसार 'चंद्रराव' येसाजीचे गादीवर येणे ही घटना १८ जून १६४६ नंतर घडली आहे असा निष्कर्ष निघतो. चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शिवाजी महाराजांची मदत झाली.पुढे ..१६४८ मध्ये स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना उद्देशून एक भाष्य केल्याचे शिवभारतात सांगितले आहे (अध्याय १३). त्यात  त्यांनी म्हटले आहे की,

"लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्रारावाची तिथे स्थापना केली." 

याचाच अर्थ ,येसाजीला(चंद्रराव) दत्तक घेताना आदिलशाहकडून संमती घेतली गेली नव्हती. त्यामुळे आदिलशाह नाराज होणे स्वाभाविकच होते. त्यातच भर म्हणून इ.स.१६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे (आदिलशाही सुभेदार) असलेल्या वाई परगण्यातला होता. त्या प्रसंगी अफझलखान याने कान्होजी जेध्यांना पत्र पाठवले होत.

चंद्रराऊ कदीम मयत जालियावरी (जावळी) गैरी लोकी पैस करून बळकाविले  आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे" - अफजलखान

 याचा अर्थ असा की, कदीम (पूर्वीचा) चंद्रराव मरण पावल्यावर जावळी गैरी लोकी  पैस करून (घुसखोरी करून) बळकाविले आहे व म्हणून त्यांच्याविरुद्ध नामजादी केली आहे. (नेमलेले आहे) वरील उताऱ्यावरून, 'गैरी लोक' या शब्दांनी चंद्रराव येसाजी व त्याचे साथीदार अभिप्रेत असावेत. येसाजीची जावळीच्या गादीवरील स्थापना आदिलशहाच्या परवानगीशिवाय झालेली होती हेच अफझलखानाच्या जावळीवरील स्वारीचे कारण होते. परंतु काही कारणास्तव ही स्वारी सुरु होण्याआधीच संपली.

पुढे शिवाजीराजे आणि चंद्रराव यांत वाद होत गेले आणि शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे भाग पडले याबद्दल उत्तरार्ध मध्ये सविस्तर लिहले आहे.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी खंड २) | संपादक : अविनाश सोवनी
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शिवाजी आणि चंद्रराव मोरे - वैद्य चिंतामण विनायक 
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर

जावळीचे मोरे प्रकरण-पूर्वार्ध

एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, अश्या परिस्थितीत जावळीकर चंद्ररावाला एकतर शिवाजीराजांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार अथवा पुढे कधीनाकधी या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघड होते. या मोऱ्यांनी महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी भाग व बहुतेक सातारा विभाग काबीज केला होता. कोकण व घाटमाथा यावरील सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.या कारणांमुळेच महाराजांचे जावळीकडे प्रारंभापासून लक्ष होते.


Jawaliche More


इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती हे आपण मागील प्रकरणात पहिले.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,

१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.

एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो. समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.

लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-

"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."



यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली.  शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)

चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.

जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शककर्ते शिवराय - विजय देशमुख

जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध