कालगणना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कालगणना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


 कालगणना हि सूर्य किंवा चंद्रावर आधारित असते. अगदी पुरातन काळापासून भारतात चांद्रमास आणि सौरवर्षावर आधारित हिंदू कालगणनेचा वापर भारतात होत आला आहे. जगभारत अनेक संस्कृती उदयास आल्या आणि कालगणना निश्चिती करण्यासाठी आपापल्या सोयीनुसार प्रत्येक संस्कृतीने कालनिर्णय ठरवला. इसवीसनपूर्व काळात रोमन साम्राज्य अस्तित्वात होते, त्यांनी वर्षाचे ३५५ दिवस कॅलेंडर वापरात आणन्यास सुरवात केली. हे कॅलेंडर देखील चांद्रमासावर आधारित होते.परंतु एका सौरवर्षात ३६५ दिवस असतात हे रोमन लोकांना परिचित होते. त्यावेळी प्रत्येक वर्षी १० दिवसांचा फरक पडत होता. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी रोमन लोकांनी दर तीन वर्षांनी एक अधिक मास (३० दिवस) घेतला. परंतु हे करूनसुद्धा भौगोलिकरित्या हा समतोल साधण्यात बराच गोंधळ उडाला.  आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी 'ज्युलिअस सीझरने' पूर्वीच्या कालगणनेत महत्वाचे फेरबदल करून इसवीसनपूर्व ४६ साली सुधारणेचा एक हुकूमनामा काढला. यालाच ज्युलियन कॅलेंडर म्हणतात. 



 आता यात नेमके काय बदल केले ते पाहूयात, पृथ्वीला सूर्याभोवती भ्रमण पूर्ण करण्यासाठी ३६५.२५६४ (अंदाजे ३६५ ¼) दिवस लागतात. म्हणून ज्युलियसने  यावर एक युक्तिवाद करून १२ महिन्यांची वाटणी करून काही महिन्यांना ३० तर काहींना ३१ दिवस अशी विभागणी केली. यात फेब्रुवारीला मात्र २८ दिवस नेमून दिले. आता ३६५ दिवस समतोल झाले असून सुद्धा ०.२५ दिवसांचा जो फरक दरवर्षी येणार होता त्यासाठी दर चार वर्षांनी येण्यार्या फेब्रुवारी महिन्यात १ अधिक करून ३६६ दिवसांचे वर्ष ठरवण्यात आले. (३६५+३६५+३६५+३६६ = ३६५.२५). इसवीसनपूर्व १ जानेवारी ४५ या वर्षी हे कॅलेंडर वापरात आणले गेले.तर हा झाला ज्युलियन कॅलेंडरचा इतिहास.

आता वळूयात 'ग्रेग्रोरीयन कॅलेंडरकडे' जे आपण सध्या वापरत आहोत.  १६व्या शतकात हे सौरकॅलेंडर वापरात का आणले गेले याचे मुख्य कारण म्हणजे सौरकालगणना आणि ज्युलियन मधला छोटासा फरक.
मूळ संपतीय वर्षात एक वर्ष हे ३६५.२४२२ दिवसांचे असते तर ज्युलियन कॅलेंडर नुसार वर्ष ३६५.२५ दिवसांचे. यामध्ये ०.००७८ दिवसांचा प्रत्येक वर्षी फरक येऊ लागल्याने, दर १२८ वर्षानंतर ज्युलियन कॅलेंडर मोजताना १ दिवसाची भर पडू लागली. इसवी पूर्व ४५ पासून हा फरक मोजायचा राहून गेला होता. १६व्या शतकात पोप ग्रेगरी १३ यांनी ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा सुचवून  इस १५८२ साली ग्रेग्रोरीयन कॅलेंडर अस्तित्वात आणले. ज्यात १५८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात १० दिवस कमी केले. (४ ऑक्टोबर नंतर १५ ऑक्टोबर चा दिवस मोजला गेला) आणि लीप वर्षासंबंधी काही त्रुटी दूर केल्या. १७५२ साली हि कालगणना ब्रिटन आणि ब्रिटीशांचे साम्राज्य असलेल्या देशात स्वीकारली गेली.


शिवाजी महाराजांना विश्वव्यापक बनवायचे असेल तर शिवजयंती तारखेने करायला हवी हा अट्टहास काही शिवप्रेमींचा आहे ( शिवजयंती तारखेने करावी या मताचा मी देखील आहे ) परंतु १९ फेब्रुवारी हा शिवजयंती साजरी करायचा दिनांक ज्युलियन कालगणनेप्रमाणे आहे हे कोणी सहसा लक्षात घेताना दिसत नाही. यासाठी वरील माहितीप्रमाणे कालमापणाचे सोप्पे गणित असे कि, इस १७५२ च्या आधी ज्या नोंदी (ज्युलियन प्रमाणे ) आहेत त्यांचा ग्रेग्रोरीयन दिनांक काढण्यासाठी नोंदीच्या तारखेत १० दिवस सरसकट वाढवावेत. यानुसार १९ फेब्रुवारी मध्ये  १० दिवस वाढवले कि ग्रेग्रोरीयन दिनांक येतो १ मार्च. (लीप वर्ष आले असेल तर हा दिनांक २९ फेब्रुवारी धरावा). 


शिवजयंती साजरी कधी करावी ? तारखेने कि तिथीने ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिवजयंतीचा वाद वाढवण्यासाठी हा लेख लिहला नसून , कालमापणाचा असाही उपयोग दैनंदिन इतिहास अभ्यासात करता येतो यासाठी हि बाजू मांडणे आवश्यक वाटले. बाकी आपण सुज्ञ आहात.

|| लेखनसीमा ||
- रोहित पवार


संदर्भ -
मला उत्तर हवय - मोहन आपटे
संशोधकाचा मित्र - ग.ह.खरे


इतिहासाची कालगणना