doctor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
doctor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 हिंदुस्थानातील वैद्यकशास्त्र तर प्राचीन आहेच परंतु पाश्चिमात्य लोकांनी पाऊल ठेवल्यापासून या वैद्यांचे आकर्षण वाढले. युरोपातील डच , फ्रेंच , पोर्तुगीज , इंग्रज इत्यादी लोक सुरवातीला व्यापाराच्या हेतूने हिंदुस्थानात आले. या परदेशी प्रवाशांप्रमाणे मध्ययुगात अनेक परदेशी डॉक्टर येऊन गेले. जहांगीर बादशाहास सर टॉमस रो, औरंगजेबास मनुची वगैरे वैद्यांनी चांगलीच भुरळ घातली होती. सोळाव्या शतकात 'अहमदनगर' येथे बुरहान निजामशाह याचा खासगी डॉक्टर म्हणून 'गार्सीया द ओर्ता' नावाच्या डॉक्टरने बरीच वर्षे सेवा केली.

पेशव्यांच्या कारकिर्दीतही अनेक पाश्चात्य वैद्य येऊन गेल्याचे दिसते. थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दीत** डॉ.सँडी** यांचे नाव आढळते तर सवाई माधवरावाच्या काळात डॉ.फिडले आणि डॉ. क्रुसो हे पुण्यात मुक्कामास होते. या डॉक्टर फिडलेने तर सवाई माधवरावास भूगोल विषयाचे बरेच ज्ञान दिले. पेशव्यांच्या राजवाड्यात व अनेक मराठे सरदारांस ते औषधे देत असत, असे सर चार्ल्स मॅलेट यांच्या पत्रव्यव्हारावरून दिसून येते. चला तर काही उल्लेख पाहुयात -


Doctors in Maratha History Peshwai





१) थोरल्या माधवरावांची प्रकृती तशी नाजूकच होती. निजामापाशी **डॉक्टर स्टुअर्ट आणि बाजवेल **हे दोन निष्णांत डॉक्टर होते, जास्तीचा पगार द्यायला लागला तरी चालेल पण त्यांना पाठवून द्या असे पत्रच माधवरावाने लिहले.

२)अजिंठ्यानजीक मुक्काम असताना थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या आईस (गोपिकाबाई) यांस पत्र लिहले आहे-
"तीर्थरूप मातुश्रीबाई वडिलांचे सेवेसी...प्रस्तुत माझी प्रकृती बरीच आहे. उरांत दुखत होते ते प्रस्तुत बरे जाले आहे. परंतु ती जागा बलट व्हावयास अवषध लावीत असतो व पोटातही फिरंग्याचे वोषध घेत असतो."

३)युरोपीय डॉक्टरांप्रमाणे आर्मिनिअन (पर्शियाच्या उत्तरेकडील प्रदेश) डॉक्टरांचीही छाप मराठ्यांवर पडली होती. पेशवाईत त्रिंबक विश्वनाथ (पेठे) याने राघोबाला लिहलेल्या पत्रात लिहले की,  
"स्वामींनी आज्ञा केली होती की, **आरमाणी वैद्यास **साहित्य, कामाठी वगैरे सर्व करून पाठवणे... "

४)माधवरावांचे आणखी एक पत्र नारायणरावास आहे , "**आरमाणी वैद्य **याजवळ तेल करावयास दिल्हे आहे. १ बाळंत शोफा , १ शहाजिरे, १ अग्नीसुन . ते तयार झाले असले पाठवून देणे"

५)कोकणातील रेवदंडा बंदराजवळ एक इंग्रजी वैद्य राहत होता. १७७३ साली त्याला पुण्यातल्या दरबारी आणले आणि दरमहा १५० रुपये त्याचा पगार ठरला.

६)सवाई माधवरावाच्या दिनचर्येत एक उल्लेख आला आहे - "श्रीमंतांच्या पायास कुरूप होते. त्याजवरील कातडी पाद्री इंग्रजांकडून छिनून काढून मलमपट्टी लावली. दुसऱ्या खेपेस पाच घटिका दिवसास पाद्री इंग्रज पायास औषध लावावयासी आला होता. पायाचे कुरूप काही मोडले आहे.

७)थोडा वेगळा उल्लेख म्हणायचा तर, १७९४ दरम्यान दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजी नावाच्या मराठी माणसाची एका मराठी कुंभाराने संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. जगातली ही कदाचित पहिली प्लास्टिक सर्जरी असावी.

८)पेशवाईच्या अखेरपर्यंत वैद्यकशास्त्रात अनेक नवनवीन शोध लागले होते आणि त्याचे फायदे युरोपीय डॉक्टरांच्या मार्फत महाराष्ट्रातील लोकांना मिळाले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात, देवीची लस पुण्यात दिली गेल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. मुंबईहुन ही लस पुण्यात येई. डॉ.कोट्स यामध्ये सहभागी होते.

"२ हजार रुपये इंग्रजाकडील वैद्याकडून घरात श्री देवी काढविल्या.. त्या यथास्थित कृपा करून आरोग्य जाहल्या. त्या वैद्यास दिले २०००..." शनिवारवाड्यात हे लसीकरण झाल्याने त्याची चर्चा झाली. डॉ. कोट्सला पुण्यात कायम ठेवा असे दुसऱ्या बाजीरावानी कर्नल क्लोजला सांगितले.


संदर्भ -
  1. इतिहास संग्रह - द. बा. पारसनीस (खंड २)
  2. पेशवे दप्तर -४३
  3. पेशवेकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भावे
  4. पेशवाईच्या सावलीत -नारायण चापेकर
  5. James wales in the times of Peshwa Sawai Madhavrao - डॉ . उदय कुलकर्णी

    - रोहित पवार

मराठ्यांच्या इतिहासात फिरंगी डॉक्टर