पुरंदरचा किल्ला आणि नरबळीची कहाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरंदरचा किल्ला आणि नरबळीची कहाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुण्याजवळील 'पुरंदर' हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक महत्वाचा दुर्ग. १६४८ सालच्या मराठ्यांच्या पहिल्या लढाईपासून ते मिर्झाराजा सोबतचा पुरंदरचा तह, अशा अनेक ऐतिहासिक घडामोडी याठिकाणी शिवकाळात घडल्या. संभाजी महाराजांचा जन्मही याच किल्ल्यावर झाला. मराठ्यांची 'राजधानी' राजगड होण्यापूर्वी बराचसा कारभार याच किल्ल्यावरून होत असे. पुरंदर किल्ल्याचे तसे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे माची पुरंदर. या माचीतून डोंगर चढत गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आणि या पुरंदरचा सोबती म्हणजे वज्रगड. १८१८ नंतर पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 





या पुरंदरची माहिती आणि काही चित्रं ही १८८९ साली लंडनमध्ये छापून आली होती. या वृत्तपत्राचं नाव आहे Illustrated London News. यात पुरंदरचा किल्ला खाली काही बांधकाम दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात वज्रगडाची बाजू दाखवलेली आहे. या आठवडी वृत्तपत्रात छापून आलेल्या माहितीचा मराठी सार असा - 

पुरंदर पुण्यापासून वीस मैल आणि बॉम्बेपासून १४४ मैल दूर आहे. त्यात पुरंदर आणि वजीरगुर या दोन टेकड्यांचा समावेश आहे, ते जमिनीपासून १५०० फूट उंचीवर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ४५०० फूट आहे. टेकडीच्या माथ्यावर ३०० फूट खाली छावणी वसलेली आहे. सुमारे १३० जणांसाठी बॅरेक्स इथे आहेत . बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सर्व भागातून सैनिकांना भरती करण्यासाठी येथे पाठवले जाते. दोन्ही टेकड्यांच्या माथ्यावर मराठ्यांच्या तटबंदीचे अवशेष आहेत, या मराठ्यांच्या इतिहासाला रक्तपात आणि राजकारणाचा मोठा इतिहास आहे. असे म्हटले जाते की, इथे मोठ्या प्रमाणावर खजिना दडला आहे, परंतु तो इथे असेलच याबद्दल खात्री नाही . इतिहास सांगतो की, या किल्ल्याचा बुरुज बांधण्यात अडचण होती. तो तीन ढासळला. म्हणून राजाने काही लोकांची कत्तल केली आणि सोन्याच्या विटांनी पाया घातला त्यानंतर मात्र तो मजबूतपणे उभा राहिला. सदर घटना एका ताम्रपटात किंवा शिलालेखात सांगितली आहे. हे रेखाचित्रे बॉम्बे मेडिकल स्टाफचे सर्जन आर.एच. मूर यांनी घेतली आहेत.




या नरबळीचा घटनेची कथा आपल्याकडील कागदपत्रात देखील आढळते. ती कथा अशी - बीदरच्या बादशहाने पुरंदरवर शेंदरी बुरुजाचे काम लावले ते शेवटास जाईना. बादशहास दृष्टांत झाला की ज्येष्ठ पुत्र आणि ज्येष्ठ सुन यांचा बळी दिल्यास काम शेवटास जाईल. बादशहाने आपला इमानी येसाजी जिबे याला सांगितले. जिभेने स्वतःचा पुत्र आणि सुन यांना बळी देण्याची तयारी दर्शवली परंतु बादशहाने नकार दिला. अखेरीस बहिरजी सोमनाथ याचा पुत्र नाथनाईक आणि त्याची पत्नी देवकाई या उभयतांना इजा अश्विन वद्य अष्टमीस बुरुजाच्या पायात जिवंत गाडण्यात आले. तेव्हा कुठे हा बुरुज उभारला गेला. )


- रोहित पवार

पुरंदरचा किल्ला आणि नरबळीची कहाणी